मोठी बातमी! हायवेशेजारी थांबलेल्या ट्रकला कारची धडक; सोलापूरच्या तिघांचा जागीच मृत्यू
By आप्पासाहेब पाटील | Updated: May 7, 2026 14:06 IST2026-05-07T14:02:35+5:302026-05-07T14:06:12+5:30
हा अपघात सोलापूर-हैद्राबाद रोडवर गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडला.

मोठी बातमी! हायवेशेजारी थांबलेल्या ट्रकला कारची धडक; सोलापूरच्या तिघांचा जागीच मृत्यू
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या धडकेत सोलापूर शहरातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोलापूर-हैद्राबाद रोडवरील शेळगी पुलावर गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडला.
शेखर सुरेकर (वय ३३, रा. कुमठा नाका, सोलापूर), अमोल धैर्यशील येरटे (वय ४०, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर) व कादर सैदू हांडे (वय ३३, कुमठा नाका) अशी मृत तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोलापूर शहरात असलेल्या दुचाकी शोरूममधील तिघे मित्र बुधवारी रात्री जेवणासाठी ढाब्यावर गेले होते. जेवण करून परत शहरात येत असताना हा अपघात झाला. सोलापूर शहरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड रोड (हैद्राबाद रोड) कडे भरधाव वेगात कार जात होती. अचानक चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोरात धडकली. या धडकेत कार चक्काचूर झाली असून कारमधील तिघांचा दोघांचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. सध्या शासकीय रूग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. तिघांच्या निधनाने शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी झाली आहे.