भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 17:25 IST2026-04-25T17:23:17+5:302026-04-25T17:25:54+5:30
Manohar Mama Bhonsle News: लैंगिक शोषणासह फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदू मनोहर मामा भोसले याचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
सोलापूर : काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहर मामा भोसले याला चौकशीसाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी अटक केले होते. त्यानंतर मनोहर भोसले याला शनिवारी माढा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला मंगळवार २८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी पोलिस ठाण्यातून दुपारी १ वाजता माढा न्यायालयात आणण्यात आले. माढा न्यायालयात मनोहर भोसलेला बसवण्यास आले. एक तास सुनावणी झाली.
पोलिसांची अधिकचा तपास करण्यासाठी मनोहरमामाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सव्वा चार वाजता तीन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
व्यापाऱ्याची फसवणूक, गुन्हा दाखल
मनोहर भोसले याने एका व्यापाऱ्यास धंद्यात प्रगती करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५० हजार रुपये स्वीकारून आपली फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली. त्यानुसार कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते त्यांच्या पथकासह पुण्याला रवाना झाले होते.
शुक्रवारी पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुपारी २ च्या सुमारास मनोहर भोसलेसह (रा. उंदरगाव, ता. करमाळा) त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. मांजरी) या दोघांना ताब्यात घेतले होते.