मतदानानंतर ईव्हीएम मशीन मिळाल्या ढाब्यावर! उपजिल्हाधिकारी म्हणाले, "हा प्रकार गंभीर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 19:04 IST2026-02-08T19:03:14+5:302026-02-08T19:04:58+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान पार पडले. सोलापूर जिल्ह्यात मतदान झाल्यानंतर तीन ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळून आल्या.

मतदानानंतर ईव्हीएम मशीन मिळाल्या ढाब्यावर! उपजिल्हाधिकारी म्हणाले, "हा प्रकार गंभीर..."
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी निवडणूक पार पडली. ७ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात एका ढाब्यावर ३ ईव्हीएम मशीन आढळून आल्याने खळबळ उडाली. हा प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनीही तीन ईव्हीएम मशीन आढळून आल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला आहे. या मशीन मतदानासाठी वापरल्या गेलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. मोहोळ शहराजवळ असलेल्या एका ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी हा प्रकार समोर आणला. स्वराज्य बार अँड हॉटेल परिसरात संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उमेश पाटील कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले होते.
उपजिल्हाधिकारी ईव्हीएम मशीन सापडल्यानंतर काय बोलले?
मोहोळमधील या प्रकारावर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, "मशीन ढाब्यावर आढळणे हा प्रकार दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणी आम्ही संबंधितांवर कारवाई करणार आहोत. आढळून आलेल्या ईव्हीएम मशीन अतिरिक्त होत्या. त्या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नाहीत", असा खुलासा त्यांनी केला.
"झोनल अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त दोन मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, वाहन चालक आणि अधिकारी यांच्यात संवाद न झाल्याने हा प्रकार घडला असावा. त्या मशीन स्ट्राँग रुममध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आल्या आहेत", अशी माहिती त्यांनी दिली.
ईव्हीएम नेण्यासाठी बस किंवा वाहन असते -अंबादास दानवे
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "ईव्हीएम मशीन नेण्यासाठी एसटी असते किंवा एखादे वाहन नेमण्यात आलेले असते. ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडले आता काय कारणे देणार? ईव्हीएम बद्दल वारंवार शंका उपस्थित होत आहे. यात निवडणूक आयोग काही तरी करून सत्ताधारी पक्षाला मदत करत असतो", असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.