३७ रेशन दुकानांचे परवाने रद्द

By Admin | Updated: July 2, 2014 00:40 IST2014-07-02T00:40:31+5:302014-07-02T00:40:31+5:30

पुरवठा अधिकारी चव्हाण: अनेक राजकीय लोकांची ‘दुकानदारी’ बंद

37 ration shops can be canceled | ३७ रेशन दुकानांचे परवाने रद्द

३७ रेशन दुकानांचे परवाने रद्द



सोलापूर: अक्कलकोट तालुक्यातील रेशन दुकाने ही राजकारण्यांचे ‘कुरण’ बनल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या या दुकानदारांची सुनावणी घेऊन तब्बल ३७ रेशन दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी कायमचे बंद केले आहेत़
आॅक्टोबर २०१३ मध्ये जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी प्रत्येक तहसीलदारांना रेशन दुकानांचे परवाने तपासण्याचे आदेश दिले होते़ अक्कलकोटचे तत्कालीन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी अक्कलकोट तालुक्यातील ४४ रेशन दुकानांची तपासणी केली होती़
बोगस धान्य वाटप, धान्यामध्ये अफरातफर, जादा दराने धान्य विक्री आदी सात प्रकारच्या तक्रारी होत्या़ त्यामुळे या सर्व रेशन दुकानांचे दफ्तर जप्त करुन मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या पथकाने तपासणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता़ त्यानुसार अक्कलकोट पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल फेब्रुवारी २०१४ रोजी अक्कलकोट पोलीस ठाण्याकडे दिला होता; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही़
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या ४४ रेशन दुकानदारांची सुनावणी पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी १० दिवसांपूर्वी घेतली़ यापैकी ७ जणांचे म्हणणे समाधानकारक वाटल्यामुळे उर्वरित ३७ जणांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत़
-------------------------
येथील परवाने झाले रद्द
दुधनी ८, मैंदर्गी ७, बोरोटे १, उडगी २, इब्राहिमपूर २, आंदेवाडी, हालहाळी, सलगर, संगोगी, नागारे, भोसगे, चिक्केहळ्ळी, बिंजगेरी, चिंचोळी, हत्तीकणबस, बबलाद, बासलेगाव, जकापूर, कल्लप्पावाडी, परमतांडा.
--------------------------
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरातील ४४ रेशन दुकानांच्या तक्रारी होत्या, सर्व दफ्र तपासून सुनावणी घेऊन ३७ दुकानांचे परवाने रद्द केले आहेत़ शेजारील दुकानांना हा तात्पुरता परवाना दिला असून लवकरच प्रसिद्धीकरण करुन रेशन दुकानांचे नवे परवाने दिले जातील़
-रमेश चव्हाण
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: 37 ration shops can be canceled