सापांना जीवदान देणाऱ्या एका सर्पमित्राचा नागाला पकडत असताना मृत्यू झाला. कोब्रा प्रजातीच्या नागाला पकडत असताना नागाने दंश केला. यात सर्पमित्र जेपी यादव यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बिहारमधील वैशाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सर्पमित्र जेपी यादव नागरी वसाहतीमध्ये आढळून येणाऱ्या सापाना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम अनेक वर्षांपासून करत होते. सापच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला.
नाग चावला अन् जमिनीवर कोसळले
राजापाकर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. रविवारी त्यांना कोब्रा नाग निघाल्याची माहिती देण्यात आली. जेपी यादव साप पकडण्यासाठी पोहोचले. ज्या ठिकाणी नाग निघाला होता, तिथे लोकांची गर्दी झाली होती.
पकडत असतानाच जेपी यादव यांच्या बोटाला नाग चावला. त्यानंतरही त्यांनी आधी त्याला डब्ब्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. पण, नाग चावल्यानंतर काही मिनिटातच विषाचा परिणाम त्यांच्यावर दिसू लागला. ते आधी खाली बसले आणि त्यानंतर कोसळले.
लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण, काही क्षणातच विषाने त्यांचा जीव घेतला.