इराणचे जगभरातील जवळपास सर्वच दूतावास सातत्याने इराणमधील घडामोडींचे अपडेट्स देत असतात. त्याचप्रमाणे, भारतातील इराणी दूतावासही प्रत्येक महत्त्वाचे अपडेट शेअर करत असतो. नवी दिल्लीतील इराणी दूतावासने नुकताच एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक नर्स मिसाईल हल्ल्याच्या अलर्टनंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन धावताना दिसत आहे.
दूतावासने १९ एप्रिल रोजी रात्री ११:२६ वाजता आपल्या 'X' हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना दूतावासने म्हटलं की, 'इराणमधील एका नर्सने नवजात बाळांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्रायल रुग्णालयावर बॉम्बफेक करत होते.' व्हिडिओमध्ये रुग्णालयातील दृश्य दिसत आहे. अचानक एक नर्स वेगाने तिथे येते आणि दोन नवजात बाळांना उचलून घेऊन धावू लागते. सायरन वाजल्यानंतर ही नर्स अलर्ट झाली असावी आणि त्यानंतर घाईघाईने मुलांना घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
त्यानंतर व्हिडिओची फ्रेम बदलते आणि हल्ल्यामुळे विविध ठिकाणी झालेलं नुकसान दाखवलं जातं. हा व्हिडीओ पाहिल्यास ते सीसीटीव्ही फुटेज असल्याचं वाटतं, ज्यावर वेळ आणि तारीख देखील नोंदवण्यात आली आहे. व्हिडिओवर १ मार्च २०२६ ही तारीख आणि ११:४० ही वेळ लिहिलेली आहे. हा व्हिडीओ पाहून लोक कमेंट्समध्ये नर्सचं भरभरून कौतुक करत आहेत.
एका युजरने कमेंट करताना लिहिलं की, 'किती शूर... पण त्याच वेळी हे पाहणं दुःखद देखील आहे, झायोनी रुग्णालयांवर बॉम्ब टाकतात आणि कोणीही त्यांचा निषेध करत नाही.' दुसऱ्या एका युजरने विचारलं की, 'जगातील कोणीही रुग्णालय आणि शाळांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध का करत नाहीय?' तर, तिसऱ्या युजरने या व्हिडिओवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे. हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगत त्याने यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही, असं म्हटलं आहे.