भारताला टी२० विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतग्रस्त आहे. रोहितच्या दुखापतीची सध्याची स्थिती काय? तो गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार का? या प्रश्नांची उत्तरे संपूर्ण भारताला जाणून घ्यायची आहेत.
रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे तो पंजाब किंग्सविरुद्धचा मागील सामना खेळू शकला नाही. पण तो सलग दुसऱ्या सामन्यासाठीही संघाबाहेर असेल का? याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करताना दिसला. हे संघासाठी आणि चाहत्यांसाठी एक चांगले लक्षण आहे. पण तो सामन्यात खेळणार की नाही, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
रोहितच्या दुखापतीबद्दल मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, रोहित शर्मा अहमदाबादमध्ये नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत आहे.
यादरम्यान, वैद्यकीय पथक आणि मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रोहितच्या सहभागाबाबत किंवा नसण्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये क्विंटन डी कॉक याला संघाने सलामीवीर म्हणून संधी दिली होती. त्याने या संधीचे सोने केले. पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार शतक ठोकले.
अशावेळी रोहित शर्मा तंदुरुस्त होऊन संघात परतल्यावर काय होईल? शतक ठोकूनही क्विंटन डी कॉकला पुन्हा संघाबाहेर बसावे लागेल का? दोघांना खेळवल्यास कुणाला बाहेर ठेवायचे? या प्रश्नांची उत्तरे संघ व्यवस्थापनाला शोधावी लागतील.