देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत गुपचूप वाढ केली आहे. कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय अशा ८४ दिवसांच्या प्लॅनची किंमत वाढवली असून, काही स्वस्त प्लॅन्स बंद करून ग्राहकांसमोर महागड्या रिचार्जचाच पर्याय ठेवला आहे. यामुळे सर्वसामान्य मोबाईल युजर्सचे बजेट कोलमडणार आहे.
फायदे तेच, किंमत जास्त: एअरटेलचा जो प्लॅन आधी ८५९ रुपयांना मिळत होता, त्यासाठी आता ग्राहकांना ८९९ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच थेट ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. किंमत वाढली असली तरी ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या प्लॅनमध्ये आजही दररोज १.५ GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० SMS मिळतात. याचबरोबर कंपनीने ७९९ रुपयांचा आपला स्वस्त प्लॅन पोर्टफोलिओमधून हटवला आहे. यामुळे कमी किमतीत जास्त वैधता शोधणाऱ्या ग्राहकांची अडचण झाली आहे.
युजर्सवर काय परिणाम होणार?या दरवाढीचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील युजर्सना बसणार आहे, जे दरमहा रिचार्ज करण्याऐवजी २-३ महिन्यांचे प्लॅन्स घेण्याला प्राधान्य देतात. सेवा तीच असताना केवळ किंमत वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरवाढीचे कारण काय?टेलिकॉम क्षेत्रातील जाणकारांच्या मते, ५जी नेटवर्कचा विस्तार, पायाभूत सुविधांवरील खर्च आणि ऑपेरेशन कॉस्ट वाढल्यामुळे कंपन्या आपल्या 'रेव्हेन्यू'मध्ये वाढ करण्यासाठी हे पाऊल उचलत आहेत. एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया देखील त्यांचे प्लॅन्स महाग करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : Airtel silently increased prepaid plan costs, hiking the 84-day plan by ₹40 and removing the ₹799 option. Users get same benefits at higher prices, impacting budget-conscious customers. Other telcos may follow.
Web Summary : एयरटेल ने प्रीपेड प्लान की कीमतें बढ़ाईं, 84 दिन का प्लान महंगा किया, 799 रुपये का प्लान हटाया। ग्राहकों को अब ज़्यादा पैसे देने होंगे, जिससे मध्यम वर्ग प्रभावित होगा। अन्य कंपनियां भी कीमतें बढ़ा सकती हैं।