माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:04 IST2025-11-04T17:03:07+5:302025-11-04T17:04:37+5:30
घटना तशी अगदीच साधारण आहे, पण ऐकून तुम्हालाही असं वाटेल की माणुसकी दाखवण्याचा काळ आता उरलाच नाही.

माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
सध्याच्या युगात कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही, यातही गोंधळून जायला होतं. अशातच एखाद्याची मदत करायला पुढे येणारे लोक तसे फारच कमी असतात. मात्र, यातही काही लोक दुसऱ्यांची मदत करायला चुकत नाहीत. इतकंच काय तर वेळेप्रसंगी आपलं हित बाजूला सारून इतरांची मदत करणारेही काही लोक असतात. मात्र, त्यांच्या सोबत असं काही घडतं की माणुसकीवरचा विश्वास उडायला लागतो. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकून सगळेच नेटीझन्स राग व्यक्त करत आहेत.
जयपूरमधील एका तरुणीने आपला असाच एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. घटना तशी अगदीच साधारण आहे, पण ऐकून तुम्हालाही असं वाटेल की माणुसकी दाखवण्याचा काळ आता उरलाच नाही. सोशल मीडियावर पोस्ट लिहिणाऱ्या या तरुणीने आपल्या घरून एका ठिकाणी जाण्यासाठी ओला बाईक राईड बुक केली होती. ठरवल्याप्रमाणे तिच्यासाठी बाईक आली आणि ती घरातून निघाली देखील... पण काही अंतरावर गेल्यावर रायडरने बाईक थांबवली. त्यावेळी चालकाने तिला सांगितलं की, बाईकमधील पेट्रोल संपले आहे.
या तरुणीने राईड कॅन्सल न करता ड्रायव्हरसोबत पेट्रोल पंपपर्यंत चालत जाण्याचा निरी घेतला. आपला काही वेळ जाईल, पण त्याचे पैसे फुकट जाऊ नयेत, म्हणून तरुणीने त्याच्यासोबत थोड्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. तिला तिच्या इच्छित स्थानापर्यंत पोहोचण्याचा वेळ ६.३३ वाजताच दाखवत होता. मात्र, ती ७ वाजेपर्यंत चालत होती. ओला रायडरचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून तिने स्वतःचा वेळ घालवला. पेट्रोल भरून झाल्यावर बाईक रायडरने तिला तिच्या इच्छित स्थळी नेऊन सोडलं.
बाईकवरून खाली उतरल्यानंतर तिने मोबाईलमध्ये दाखवल्याप्रमाणे १०१ रुपये भाडे दिले आणि ती निघू लागली. मात्र, रायडरने तिला थांबवत आणखी ७ रुपये मागितले. त्याने तिला सांगितले की, माझ्याकडे १०८ रुपये भाडे दाखवत आहे. यावर तरुणीने म्हटले की माझ्याकडे १०१ दाखवत आहे. यावर तो म्हणाला की, वाढले असतील कदाचित.. त्यावर तिच्या लक्षात आलं की, जो वेळ तिने चालण्यात दवडला त्याचेच हे पैसे होते. तिने ते ७ रुपये दिले आणि तिथून निघाली. घरी आल्यावर तिने आईला ही गोष्ट सांगितली आणि तिला रडू येऊ लागलं. या घटनेत ७ रुपयांचे इतके मोल तिला वाटले नाही. पण, जो मनाचा मोठेपणा तिने दाखवला, त्या बदल्यात तिला जे फळ मिळालं त्याचं तिला दुःख झालं.