बेकायदा दारू वाहतूक करताना सोलापूर येथील दोघे ताब्यात, बांदा पोलिसांकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:34 IST2025-10-20T18:34:09+5:302025-10-20T18:34:45+5:30
८ लाखाचा मुद्देमाल जप्त

बेकायदा दारू वाहतूक करताना सोलापूर येथील दोघे ताब्यात, बांदा पोलिसांकडून कारवाई
सावंतवाडी : बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांकडून विलवडे येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवीण महावीर बोराडे (वय ३०, रा. मोडनिंब, पाटोळे वस्ती, बैरागवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), राम नागनाथ माने (३५, रा. मुक्काम पोस्ट आष्टी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून तब्बल ८ लाख ६९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे २:५५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा पोलिसांनी संशयास्पद पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा आढळून आला.
या दारू साठ्याची किंमत ३ लाख ६९ हजार ६०० रुपये इतकी आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची पिकअप गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल खरात यांच्या फिर्यादीवरून बांदा पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश गवस, दादा परब आणि पोलिस कॉन्स्टेबल खरात यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल तेली करत आहेत.