Sindhudurg: चंदगडमधील दोघांना अवैध गोवा बनावट दारूसह अटक, पाठलाग करून कार पकडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:08 IST2025-10-15T17:08:00+5:302025-10-15T17:08:00+5:30
स्थानिकांनी रस्ता अडवून केली मदत

Sindhudurg: चंदगडमधील दोघांना अवैध गोवा बनावट दारूसह अटक, पाठलाग करून कार पकडली
सावंतवाडी : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना आंबोली पोलिसांनी पाठलाग करून कोल्हापूर येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाखाच्या दारूसह पाच लाखांची कार, असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही दारू पकडण्यासाठी चौकुळ ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केले. त्याठिकाणी रस्ता ब्लॉक करून गाडी अडविण्यासाठी मदत केली. सतीश भीमराव आर्दळकर (३७, रा. अडकूर-चंदगड, कोल्हापूर), अविनाश दशरथ पाटील ( ३२ वर्षे, रा. बोंदुर्डी-चंदगड, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
गाडीची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे २० बॉक्स दारू आढळून आले. ज्यांची किंमत सुमारे १ लाख २ हजार रुपये आहे. दारूसह ५ लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी, असा एकूण ६ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांचा पंचनामा करण्यात येऊन गुन्हा नोंद करण्याची व अटकेची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे आणि गौरव परब यांचा समावेश होता.
स्थानिकांनी रस्ता अडवून केली मदत
सोमवारी (दि. १३) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलिस दूरक्षेत्रावरील पोलिस पथक वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी कार सावंतवाडीकडून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने न थांबता गाडी वेगाने पळवून नेली. यावर पोलिसांनी तातडीने गाडीचा पाठलाग सुरू केला. चौकुळ रस्त्यावर पाठलाग सुरू असताना पोलिसांनी चौकुळ येथील स्थानिक लोकांना रस्ता अडविण्यास सांगितले. स्थानिकांच्या मदतीने अखेरीस ही गाडी थांबविण्यात पोलिसांना यश आले.