Sindhudurg: चोरट्यांनी दत्त मंदिरातील मूर्तीच केली लंपास; सायरन वाजताच रिव्हॉल्वर, कटावणी टाकून पसार, सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:27 IST2025-07-05T17:04:39+5:302025-07-05T17:27:40+5:30
मंदिराची करण्यात आली होती रेकी

Sindhudurg: चोरट्यांनी दत्त मंदिरातील मूर्तीच केली लंपास; सायरन वाजताच रिव्हॉल्वर, कटावणी टाकून पसार, सीसीटीव्हीत कैद
कणकवली : जानवली, कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरांमधील धातूची मूर्तीच अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. दरम्यान, सायरन वाजताच चोरट्यांनी पाच काडतूस भरलेले गावठी रिव्हॉल्वर व कटावणी घटनास्थळीच टाकून पळ काढला. या घटनेमुळे कणकवली परिसरात खळबळ उडाली. काल, शुकवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
कणकवली पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासहित स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तपासासाठी पथके कार्यरत करण्यात आली असून चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
कणकवली तालुक्यातील जानवली येथे मुंबई - गोवा महामार्ग लगत असलेल्या कृष्णनगरी या ठिकाणी हे स्वयंभू दत्त मंदिर २०१९ मध्ये उभारण्यात आले होते. ओंकार मोहिते यांच्या खासगी मालकीचे हे मंदिर असून घरातील एका खोलीमध्ये जमिनीत ही मूर्ती मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून या ठिकाणी स्वयंभू दत्त मंदिराची उभारणी केली. चोरीबाबत मोहिते यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिराची करण्यात आली होती रेकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी या मंदिराजवळ चौघे तरुण आले होते. यातील एकाने मोहिते यांना मला ओळखलं काय? असं विचारून या मंदिरात असलेल्या दत्त मूर्तीचे दर्शन देखील घेतले होते. तसेच या ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग करत फोटोही घेतले होते. त्यानंतर त्यांनी मंदिरातील मूर्ती सोन्याची आहे का? अशी विचारणा केली होती. त्यानंतर चोरीच्या घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केले असता त्यामध्ये संशयित तिघेजण व तीन तारीखला आलेल्या तरुणांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती आढळत असल्याचेही पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
सायरन वाजताच चोरटे पसार
कटावणीच्या साहाय्याने चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून ही मूर्ती पळवली. मात्र, याच दरम्यान सीसीटीव्हीला कनेक्ट असलेला सायरन वाजल्याने मोहिते कुटुंबीय घराबाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांनी मोहिते यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर काही वेळातच चोरटे तेथून पळाले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांकडून ठसे घेण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.