Sindhudurg Crime: फोंडाघाट घरफोडी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:54 IST2025-12-29T12:53:47+5:302025-12-29T12:54:32+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कणकवली येथे कारवाई

Sindhudurg Crime: फोंडाघाट घरफोडी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
कणकवली : हत्यार बाळगून जबरी चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपी राजन शंकर गमरे( वय ५७, रा. कालिना, सुंदरनगर, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी कणकवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पुढील कार्यवाहीसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वी याप्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कणकवली पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३२२/२०२५, बीएनएस २०२३चे कलम ३३३, ३०९(५), ३ (५) या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्फत समांतर तपास चालू होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतगाराकडून प्राप्त माहितीनुसार गुन्ह्यातील संबंधित आरोपी हा कणकवली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, पोलिस हवालदार आशिष गंगावणे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, पोलिस हवालदार किरण देसाई यांनी केली. फोंडाघाट येथे झालेल्या जबरी चोरी प्रकरणात या आरोपीचा सहभाग होता.