Sindhudurg: टीईटी परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकाने संपवलं जीवन, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ
By अनंत खं.जाधव | Updated: October 11, 2025 15:43 IST2025-10-11T15:41:54+5:302025-10-11T15:43:48+5:30
Sindhudurg News: आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी काल, शुक्रवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sindhudurg: टीईटी परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने मुख्याध्यापकाने संपवलं जीवन, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ
सावंतवाडी - आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम ( ३६) यांनी गेळे- कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी काल, शुक्रवारी (दि.१०) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान कदम यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपण टीईटी परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कामावरून घरी परतलेल्या कदम यांच्या भावाने खिडकीतून पाहिले असता त्यांना आनंद कदम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. दरवाजाला आतून कडी लावलेली होती. यानंतर त्यांनी तातडीने आंबोली पोलीस स्थानकात या घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत बघितले असता कदम मृत पावले होते.
आनंद कदम हे आंबोली गावठण वाडी येथील शाळेत मुख्याध्या पक होते. ते शिस्तप्रिय शिक्षक म्हणून सर्वत्र त्यांची ओळख होते. दरम्यान अलिकडेच शासनाच्या शिक्षण विभागाने कार्यरत शिक्षकांना टीईटीची सक्तीची केली आहे. कदम यांनी मागच्या वेळी टीईटीची परिक्षा दिली होती. पण त्यात ते नापास झाले होते. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना त्याच्या भावाने खिडकीतून बघितली आणि पोलिसांना माहिती दिली. आंबोली पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गलोले आणि हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणी करीता आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.
घटनास्थळी चिठ्ठी सापडली
दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. ज्यात कदम यांनी “मी टीईटी परीक्षा पास होऊ शकत नाही”, असा उल्लेख करून आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.. घटनेच्यावेळी आनंद कदम यांचे आई-वडील पुणे येथे होते तर त्यांची पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा गडहिंग्लज येथे राहत होते. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. कदम यांच्या निधनाने आंबोली आणि गेळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून. शिक्षक वर्ग, राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.