मतदानासाठी यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: November 1, 2015 00:06 IST2015-10-31T23:20:23+5:302015-11-01T00:06:48+5:30

दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक : १0४ कर्मचाऱ्यांसह ११४ पोलिसांचा फौजफाटा

Prepare the system for voting | मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मतदानासाठी यंत्रणा सज्ज

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत १७ नगरसेवकांसाठी ४८ उमेदवार रिंगणात उतरले असून रविवारी (दि. १) होणाऱ्या मतदानासाठी सर्व १७ प्रभागांसाठी १७ मतदान केंद्रे निर्माण केली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी दोन अधिकाऱ्यांसह १०४ कर्मचारी मतदान केंद्र्रावर नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली.
२७ जवानांची एसआरपी तुकडी, ११४ पोलिसांच्या फौजफाट्यासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी आतापर्यंत उमेदवारांसह मुख्य कार्यकर्त्यांनी जी शांतता व संयम दाखवला तसाच मतदानालाही राखावा, असे आवाहन विठ्ठल इनामदार यांनी केले आहे.
कसई-दोडामार्ग नगरपंचायतीसाठी पहिलीच निवडणूक होत आहे. गेल्या तीन वे चार आठवड्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रणधुमाळी उडाली होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय कलगीतुरा येथे चांगलाच रंगलेला सर्वांनी अनुभवला. विविध नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या खैरातीने मतदारही क्षणभर चलबिचल झाल्याचे चित्र दिसून आले. पण राजकीय मंडळीनी याचा चांगलाच फायदा उठवत आपली बाजू कशी सकारात्मक व योग्य असल्याचे प्रकर्षाने मांडताना कसलाही कसूर सोडला नाही. शुक्रवारी सायंकाळी प्रत्यक्ष प्रचाराची सांगता झाली. मतदारांना वळविण्यासाठी शुक्रवारची रात्र व शनिवारची रात्र उमेदवारांच्या खिसा गार करणारी ठरली. पैसा जाऊदे पण विजय पदरी पडू देत यासाठी उमेदवारांनीही आपला हात ढिला सोडला. मतदानाच्या पूर्वसंध्येला याची सर्व शहराने अनुभूती घेतली.
दरम्यान, मतदानाच्या पूर्वसंध्येला प्रशासन प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे विठ्ठल इनामदार यांनी निवडणुकीत आता पर्यंतच्या शांततेत सर्वांचे सहकार्य राहीले आहे. तशीच शांतता मतदानादिवशी व निकाला दिवशीही कायम ठेवावी. उमेदवारांसह संबंधित कार्यकर्त्यांनी उत्साहाला आवर घालत सर्वसामान्यांसाठी व आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी अविरत प्रयत्न करा पण कायद्याच्या चौकटीत राहूनच करा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
चोख पोलीस बंदोबस्त
कंदील रात्रीतील अर्थपूर्ण प्रचाराला आळा बसवा या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्याहून एक एसआरपी तुकडीही मागवून घेण्यात आली आहे. या व्यक्तीरिक्त एक पोलीस उपविभागीय अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४८ होमगार्ड, ४ वायरेलसेट वाहने, ८ वॉकीटॉकी व ५४ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Prepare the system for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.