गव्यांकडून भातशेतीची नुकसानी

By Admin | Updated: August 26, 2015 22:55 IST2015-08-26T22:55:59+5:302015-08-26T22:55:59+5:30

शेतकऱ्यांचे धाबे दणाणले : वडाचापाट, चाफेखोल, माळगावमधील प्रकार

Paddy cultivation loss | गव्यांकडून भातशेतीची नुकसानी

गव्यांकडून भातशेतीची नुकसानी

बागायत : गेले आठ दिवस वडाचापाट, चाफेखोल व माळगांव येथील शेतकऱ्यांचे गव्यांनी धाबे दणाणून सोडले आहेत. या तिन्ही गावातील पोलीस पाटील यांना या घटनेची माहिती येथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली व पोलीस पाटलांनी शेताची पाहणी करून वन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सर्व प्रकार सांगितला. मात्र, वनअधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांना मीठ चोळले. शेताची पाहणी करण्याचे किंवा गव्यांचा बंदोबस्त करण्याचे सोडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन पोलीस पाटीलांमार्फत केले.
यावर्षी कमी पावसाचा तडाखा त्यात पेरणी, लावणी उशिर, बियाण्यांची महागाई, महागडी खते, वाढलेली मजुरी, शेतीला नसलेला बाजारभाव, विजेची वाढलेली बिले यापासून डोके वर काढून केलेली शेती. त्यात माकड, रानटी डुक्कर, इतर रानटी प्राण्यांपासून वारंवार होणारा त्रास आणि आता मात्र गेले आठ दिवस ठाण मांडून बसलेल्या गव्यांच्या कळपामुळे चाफेखोल, वडाचापाट, माळगांव येथील शेतकरी मोठ्या चिंतेत पडलेला आहे. कारण आता हातातोंडाशी आलेले भात, भुईमूग, नाचणी, भाजीपाला गव्यांनी खावून व नाचून पूर्णपणे जमिनदोस्त केला आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे कोणीही शासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायत स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील किंवा जिल्हा परिषद स्तरावरील लोकांनी दाद घेतलेली नाही याची खंत या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
चाफेखोल येथील शेतकरी रविंद्र जाधव यांनी या वन्यप्राण्यांचा वनविभागाने जर बंदोबस्त केला नाही तर आम्हा शेतकऱ्यांना शेतीशिवाय उपाशी रहावे लागेल. कारण सध्या रेशनही मिळत नाही. त्यामुळे अशी नासधूस झाल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. गव्यांच्या रोजच्या वावरामुळे शेतीच्या कामाला न जाण्याचे शेतातील कामगारांनी पसंत केले आहे. त्यामुळे ठोस पावले उचलावीत असा इशारा चाफेखोल, माळगांव, वडाचापाट येथील सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी शेतकरी कृष्णा जाधव, प्रकाश जाधव, रवींद्र साळुंखे, बंडू कदम, प्रमोद कदम, रवि साळकर, लवू वरक, शाहू वरक, रवींद्र जाधव, सुरेश खांबल, बाळा कदम उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Paddy cultivation loss