कणकवली : सिंधुदुर्गच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते, फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. चंद्रपूर येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांची आता सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे.नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते, फळसेवाडी असले तरीही त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे झाले. सेंट झेवियर कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयातून २०१९ मध्ये त्यांनी पदवी संपादन केली. पदवी संपादन करतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचे निश्चित केले होते.पदवीधर होताच त्यांनी बेंगलोर येथे यूपीएससीसाठी क्लास जॉईन केला होता. त्यावेळी कोरोनामुळे त्यांना क्लास सोडून पुन्हा मुंबईला परतावे लागले होते. मात्र, त्याही परिस्थितीत त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करत २०२० मध्ये त्यांनी पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा दिली. त्या परीक्षेत त्या १६२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. सिंधू कन्येची सिंधुदुर्गच्या अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी सोलापूर, चंद्रपूर जिल्ह्यातही यापूर्वी सेवा बजावली आहे.
नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:59 IST