शिवीगाळ, धमकी दिल्याची कनिष्ठ अभियंत्यांची तक्रार; माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:29 IST2025-10-03T16:28:31+5:302025-10-03T16:29:33+5:30

कुडाळ : झाराप येथील मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान, येथे उपस्थित उद्धवसेनेचे माजी आमदार ...

Junior engineers complain of abuse, threats Case filed against former MLA Vaibhav Naik | शिवीगाळ, धमकी दिल्याची कनिष्ठ अभियंत्यांची तक्रार; माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

शिवीगाळ, धमकी दिल्याची कनिष्ठ अभियंत्यांची तक्रार; माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

कुडाळ : झाराप येथील मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान, येथे उपस्थित उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश राकेश साळुंके (वय ३३ वर्ष, रा. पिंगुळी, मूळ रा. धुळे) यांना जातीय शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात मुकेश साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, झाराप येथे मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजता कार आणि दुचाकी यांच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील लवू पेडणेकर हा विद्यार्थी जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेले रोशन पेडणेकर आणि सोहम परब हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी व गोव्याला पाठविण्यात आले.

या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक देखील याठिकाणी उपस्थित होते. सायंकाळी सुमारे चार वाजता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीच्या वरिष्ठ अधिकारी वृषाली पाटील यांच्या समवेत कर्तव्य बजावत असताना, कोणत्याही कारणाशिवाय संशयित आरोपी वैभव नाईक यांनी हाताने आपल्या गालावर आणि कानावर मारहाण करून जातीवाचक शब्द वापरले. तसेच आपण पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेलो असताना आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार मुकेश साळुंके यांनी दिली आहे.

विविध कलमांनुसार गुन्हा दाखल

या तक्रारीवरून कुडाळ पोलिस ठाण्यात वैभव नाईक यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) २०२३ च्या कलम १२१, १३२, ३५२, ३५१(३) व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या कलम ३(२)(वीए), ३(१)(आर), ३(१)(एस) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे हे करीत आहेत.

Web Title: Junior engineers complain of abuse, threats Case filed against former MLA Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.