Sindhudurg: दोन टन काजू बी लंपास करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश, एलसीबीने चौघांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:55 IST2026-03-31T15:55:15+5:302026-03-31T15:55:40+5:30
कातकरी समाजातील तरुणांसह काजू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकावरही गुन्हा दाखल

Sindhudurg: दोन टन काजू बी लंपास करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश, एलसीबीने चौघांना केली अटक
कणकवली : तालुक्यातील कोंडये, वरचीवाडी येथील दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे दोन टन काजू बी चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने चार आरोपींना गजाआड केले आहे. कातकरी समाजातील तीन आरोपी या गुन्ह्यात सहभागी असून त्यांनी विरण, पोईप परिसरामध्ये काजू बीची विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे.
कोंडये येथे दत्तात्रय तेंडुलकर आणि विलास तेंडुलकर यांची सात एकर क्षेत्रात काजू बागायत आहे. या बागायतीमध्ये एक हजार काजूची झाडे आहेत. तसेच पक्का चिरेबंदी शेतमांगर देखील बांधण्यात आला आहे. या शेतमांगरामध्ये त्यांनी काजू बियांचा साठा करून ठेवला होता. २३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास ते शेतमांगरामध्ये शेतीसाहित्य आणण्यासाठी आले असता त्यांना दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता मांगरातील दोन टन काजू साठा गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तेंडुलकर यांनी या चोरी प्रकरणी कणकवलीपोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तपास सुरु केला. दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. गुन्ह्यात कातकरी समाजातील तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी पप्या सुनील पवार (वय २६, गणपती साना, कणकवली), संदीप सुरेश पवार (२३, पोईप, वडाचा पाट), बंटी स्वप्नील पवार (२२, गणपतीसाना,कणकवली) व ज्या गाडीतून या काजू बियांची वाहतूक केली त्या अनंत मधुकर परब (रा. पोईप) या गाडी मालकाला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी काजू बियांची वाहतूक करण्याकरता वापरलेला टेम्पो देखील ताब्यात घेतला आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसांडेकर, ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी आदींच्या पथकाने केली.