Sindhudurg: बिबट्याची नखे विक्रीसाठी आले, अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले; डामरे येथे चौघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:52 IST2025-10-01T12:48:50+5:302025-10-01T12:52:09+5:30
संशियत आरोपी कणकवली, कोल्हापूर, बेळगाव येथील

Sindhudurg: बिबट्याची नखे विक्रीसाठी आले, अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले; डामरे येथे चौघे ताब्यात
कणकवली : कणकवली वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनविभागाच्या पथकाने सापळा रचत डामरे गावच्या हद्दीमध्ये स्वामी समर्थ मठाजवळ बिबट्याची नखे व सुळे (दात) याच्या विक्रीसाठी आलेल्या चौघा व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून बिबट्याची बारा नखे व चार सुळे (दात) तसेच तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
या आरोपींची नावे विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट, ता. कणकवली), कृष्णात भिकाजी रेपे (रा. अकनुर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी (रा. गळतगा, ता. चिकोडी, जि. बेळगाव) व परशुराम प्रकाश बोधले (रा. नवलीहाळ, ता.चिकोडी, जि. बेळगाव) अशी आहेत.
कणकवली फोंडाघाट रस्त्यावर डामरे येथे पकडलेल्या या चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद व उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश शर्मा, सहायक वनसंरक्षक एस. के. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कणकवली एस. एस. पाटील, फोंडा वनपाल धुळू कोळेकर, देवगड वनपाल श्रीकृष्ण परीट, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, वनरक्षक सुखदेव गळवे, प्रतिराज शिंदे, सिद्धार्थ शिंदे, रामदास घुगे, नितेंद्र पोर्लेकर, रोहित सोनगेकर, अंकुश माने, स्वाती व्हनवाडे, व रिद्धेश तेली, सागर ठाकूर यांनी केली. त्यांना मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे सहकार्य लाभले. वनविभागाच्या या कारवाईमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.