Sindhudurg: दारूच्या नशेत मुलाने केला आईचा खून, वारगाव येथील घटना; संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:17 IST2025-09-11T12:16:07+5:302025-09-11T12:17:49+5:30
किरकोळ कारणावरून कोयत्याने वार

Sindhudurg: दारूच्या नशेत मुलाने केला आईचा खून, वारगाव येथील घटना; संशयित ताब्यात
कणकवली : दारूच्या नशेमध्ये मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे बुधवारी (दि.१०) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घडली. प्रभावती रामचंद्र सोरफ (वय ८०) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा रवींद्र रामचंद्र सोरफ (४५) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलिस ठाण्यात सुरू आहे.
संशयित आरोपी रवींद्र सोरफ याला दारूचे व्यसन आहे. सोरफ कुटुंबीय वारगांव सोरफ - सुतारवाडी येथील एका घरात राहत असून या घरामध्ये पाच बिऱ्हाडे आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास प्रभावती व मुलगा रवींद्र यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यातून संतप्त झालेल्या रवींद्र याने थेट कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी वार केले. रवींद्र याने रक्तबंबाळ स्थितीतील आईला ओढत घराच्या हॉलमध्ये आणले. अवघ्या काही क्षणामध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सोरफ कुटुंबीय हादरून गेले.
स्थानिकांनी याबाबत माहिती दिल्यानंतर कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या डोक्यावर ठिकठिकाणी कोयत्याचे गंभीर वार होते. पोलिसांनी संशयित रवींद्र याला ताब्यात घेऊन कणकवली पोलिस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे वारगाव परिसरासह कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.