रेल्वेची धडक बसून रिल स्टार ‘बेडूक भाई’ ठार; सावंतवाडीहून निघाला होता बहिणीला भेटायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:48 IST2025-10-08T13:47:56+5:302025-10-08T13:48:20+5:30
Reel Star Beduk Bhai Death: मडुरा येथील घटना

रेल्वेची धडक बसून रिल स्टार ‘बेडूक भाई’ ठार; सावंतवाडीहून निघाला होता बहिणीला भेटायला
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडीहून आपल्या पाडलोस येथील बहिणीला भेटायला चाललेल्या दीपक विठ्ठल पाटकर (३५, रा. समाजमंदिर, सावंतवाडी) हा रेल्वेरूळ ओलांडून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मंगला एक्स्प्रेसची धडक बसून जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मडुरा रेल्वे स्थानक परिसरात घडली.
दीपक हा रिलस्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्याला ‘बेडूक भाई’ या नावाने रिल प्रसिद्ध झाल्या होत्या.
सावंतवाडी समाजमंदिर परिसरात राहणारा दीपक हा गेली अनेक वर्षे मिळेल ते काम करत होता. तो सावंतवाडीत कधीही फिरताना दिसत असे. तो लोकांचे, युवकांचे मनोरंजन करत असे त्यामुळे तो अनेकांच्या लक्षात होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने सोशल मीडियावर ‘बेडूक भाई’ हे नवीन पेज सुरू केले होते.
या माध्यमातून तो लोकांना हसवणारे व्हिडिओ तयार करून टाकत होता. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याने आपला एक असाच व्हिडिओ तयार केला होता. त्यात ‘तुम्ही आनंदी राहा, सगळ्यांना सुद्धा आनंदात राहायला सांगा’, असा संदेश दिला होता.