Coronavirus: Sawantwadi youngsters help to feed street dogs vrd | Coronavirus: एक घास मुक्या प्राण्यासाठी...; सावंतवाडीत तरुणांची भूतदया

Coronavirus: एक घास मुक्या प्राण्यासाठी...; सावंतवाडीत तरुणांची भूतदया

अनंत जाधव 
सावंतवाडी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा सोडून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे सगळ्यांचेच हाल झाले. यातून मनुष्य पण सुटला नाही तर मुक्याप्राण्यांचे तरी काय, आज प्रत्येक गावात शहरात श्वानाचे प्रमाण अधिक आहे. अधिक तर श्वान हे भटके असतात. त्याचे नेहमीचे अन्न हे हॉटेल तसेच दुकानदारांनी काय तरी आपणास घालेल आणि त्यावर आयुष्यातील दिवस ढकलणे असेच असते. पण लॉकडाऊनमध्ये मनुष्य प्राण्याचे जेवढे हाल झाले त्यापेक्षा मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत.

मनुष्य तरी आपणास काय हवे आणि काय नको हे सांगू शकेल पण मुके प्राणी कोणाला सांगणार, अशी त्यांची स्थीती आहे. पण यासाठी सावंतवाडीतील युवक पुढे आले असून एक घास मुक्या प्राण्यांसाठी म्हणत देव्या सूर्याजी व मंगेश तळवणेकर यांच्या ग्रुपचे जवळपास दहा ते पंधरा युवक दुपारी व रात्री मुक्या प्राण्याच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. आता जवळपास बारा ते तेरा दिवस होऊन गेले आहेत. सरकारने सर्वत्र अत्यावश्यक सेवा तेवढी सुरू ठेवली आहे. मात्र बाकीची दुकाने बंद केली आहेत. त्यामुळे मनुष्य प्राणी हा आपणास लागेल तेवढे अन्न धान्य घेऊन जात असतो. पण यामध्ये जास्त हाल होत आहेत ते मुक्या प्राण्याचे. त्यांच्यासाठी कोण पुढे येत नव्हते. आपल्याकडे घरगुती श्वानापेक्षा भटके श्वान (कुत्रे) हे अधिक आहेत. शहराच्या प्रत्येक भागात दहा ते पंधरा कुत्रे हे फिरत असतात. मात्र सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर या कुत्र्यांची अवस्था एकदम बिकट झाली आहे.

बहुतेक कुत्रे हे हॉटेलच्या आजूबाजूलाच घुटमळत असलेले दिसत असतात. तर काही कुत्रे बेकरी तसेच चिकन, मटणच्या दुकानाजवळ असतात. पण आता या सर्व व्यवस्था अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने बंद आहेत. त्याचा परिणाम अनेक कुत्र्यांवर झाला आहे. अनेक कुत्रे अन्न पाण्याविना शेवटची घटका मोजत आहेत. तर काही कुत्र्यांची पिल्ले ही रस्त्यावर फिरतात आणि कुठल्यातरी वाहनाखाली मिळाली की ती मृत पावतात. हे मुक्या प्राण्यांचे होणारे हाल अनेकांना बघवत नव्हते. त्यांच्यासाठी कोणीतरी पुढे आले पाहिजे अशीच सर्वांची मनधारण होती. पण कोण पुढे येत नव्हते. मात्र सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर व युवा रक्तदाता ग्रुपचे देव्या सूर्याजी या दोघांनी जवळ पास दहा पंधरा युवकांना एकत्र करत मुक्या प्राण्यांसाठी एक घास ही संकल्पना राबवली आणि त्यांना ब-यापैकी यश येत आहे.

मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी ग्रुपचे युवक दुपारी व रात्रीच्या वेळी शहरातील सर्व कुत्र्यांना अन्नदान करतात. कारिवडे येथे तळवणेकर यांच्या घरी या कुत्र्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था केली जाते. हा ग्रुप तब्बल शंभर ते दिडशे कुत्र्यांना जेवण देत आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक कुत्रे हे रस्त्यावरच बसलेले असतात. त्यामुळे त्यांना पत्रावळीतून हे जेवणे दिले जाते. त्यामुळे अनेक कुत्रे हे गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा शहरात दिसू लागले आहेत.

मंगेश तळवणेकर यांना पूर्वीपासून समाज कार्याची आवड आहे. त्यामुळे अनेक गरीब व गरजूंना ते नेहमीच मदत करत असतात. तर देव्या सूर्याजी ग्रुप हा अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेत असतो. अनेक रक्तदान शिबीर भरवणे तसेच गरजूंना मदत करणे यासाठी नेहमी अग्रभागी असतात. तर त्याच्या खांद्याला खांदा लावून अनेक युवकही मदत करत असून, अर्चित पोकळे, साईश निर्गुण, अनिकेत पाटणकर, दिग्विजय मुरगूड, मेहर पडते, पवन बिद्रे, पार्थिल माठेकर, साई म्हापसेकर, महेश बांदेकर, गौतम माटेकर, अभि गवस, पांडूरंग वर्दम, रघवेंद्र चितारी, बिट्या बिद्रे, पंकज बिद्रे आदी युवक या कामात मोलाची मदत करताना दिसत आहेत.

अनोख्या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक
युवकांच्या या अनोख्या मोहिमेमुळे शहरातील अनेक नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. तर काही नागरिकही या कामात मदतीसाठी पुढे येत आहेत. या युवकांची प्रेरणा घेऊन आणखीही काही युवकांनी पुढे यावे त्यातून मुक्या प्राण्यांना या कसोटीच्या दिवसात पोटभर अन्न मिळेलच तसेच मनुष्य प्राण्याप्रमाणे त्यांनाही जगण्याचा अधिकार मिळेल, हा त्याच्या मागचा आमचा उद्देश असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर व देव्या सूर्याजी यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus: Sawantwadi youngsters help to feed street dogs vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.