संततधार सुरूच

By Admin | Updated: July 26, 2015 00:01 IST2015-07-25T23:53:57+5:302015-07-26T00:01:18+5:30

सिंधुदुर्गात वृद्ध वाहून गेल्याची भीती : बांद्यात घरावर कोसळले झाड

Continuous growth | संततधार सुरूच

संततधार सुरूच

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील घोडगे-पायरवाडी येथील अनंत शंकर आंगचेकर (वय ७५) हे ओहोळाकडे शौचालयास गेले होते. ते बराच वेळ झाला तरी परत न आल्याने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच आहे. बांदा शहरातील निमजगावाडी येथील सखाराम सावंत यांच्या राहत्या घरावर झाड कोसळून नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले.
घोडगे-पायरवाडी येथील अनंत आंगचेकर हे शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून गायब होते. ते घराशेजारच्या ओहोळातून वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांचा ओहोळाच्या व नदीच्या किनारी शोध घेण्यात आला. मात्र, शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते सापडले नाहीत. शुक्रवारी सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे आंगचेकर यांच्या घराशेजारील ओहोळही तुडुंब भरून वाहत होता. अशावेळी अनंत आंगचेकर तिकडे गेल्याने ते वाहून गेल्याची शक्यता उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभर बांदा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. निजमगा येथील महापुरुष देवस्थाननजीक असलेले पिंपळाचे भले मोठे झाड नजीकच्या घरावर पडले. यामध्ये
सखाराम मुकुंद सावंत यांच्या घराचे ८६ हजार २५० रुपयांचे, तर वैशाली अशोक सावंत यांच्या घराचे दोन हजार ८५0 रुपयांचे नुकसान झाले.

भुईबावडा घाटातील वाहतूक विस्कळीत
गगनबावड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर भुईबावडा घाटात रस्त्यावर झाड व दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत बांधकामचे कर्मचारी तेथे पोहोचले नव्हते. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती.
 

Web Title: Continuous growth