सावंतवाडी : सावंतवाडी शहरात असलेल्या एका राष्ट्रीयीकृत बँकेचा कर्मचारी भाड्याने राहत असलेल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला आहे. अभिषेक प्रवीण सोरेंग (३२, सध्या रा. माठेवाडा, मूळ रा. छोरीबिंदा, झारखंड) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती बँकेचे व्यवस्थापक शरद शिवाजी पेडामकर यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली आहे. झोपेतच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.अभिषेक हे शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांची २०२२ पासून या बँकेत नेमणूक झाली होती. शुक्रवारी (दि. १०) नेहमीप्रमाणे ते बँकेत काम करून रात्री ८.३०च्या सुमारास घरी परतले होते. सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास अभिषेक सोरेंग यांचा भाऊ अभिनव सोरेंग याने बँकेच्या शाखा व्यवस्थापकांच्या फोनवर फोन करून सांगितले की, अभिषेक हा गेले दोन दिवसापासून फोन उचलत नाही. तुम्ही त्याच्या खोलीवर जाऊन पहा. त्यानुसार बँक व्यवस्थापक शरद पेडामकर यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासोबत अभिषेक सोरेंग राहत असलेल्या माठेवाडा येथील गणेश रेसिडेन्सी येथे त्यांच्या खोलीकडे जाऊन पाहिले असता खोलीला आतून कडी लावलेली होती. यानंतर बँक व्यवस्थापकांनी खोलीचे मालक पुंडलिक दळवी यांना बोलावून घेऊन त्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडून बेडरूममध्ये गेले असता अभिषेक हा गादीवर झोपलेला दिसला. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्याची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सावंतवाडी पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
सावंतवाडीत बँक अधिकारी मृतावस्थेत आढळले, मूळचे झारखंडचे रहिवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:52 IST