Sindhudurg: नांदगाव-असलदे ‘रास्ता रोको’ भोवला; राजू शेट्टी यांच्यासह ३७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:10 IST2026-03-25T15:10:19+5:302026-03-25T15:10:54+5:30
बंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका

Sindhudurg: नांदगाव-असलदे ‘रास्ता रोको’ भोवला; राजू शेट्टी यांच्यासह ३७ जणांवर गुन्हा दाखल
कणकवली : आंबा-काजू बागायतदारांच्या नुकसानभरपाईसाठी सोमवारी झालेले आंदोलन आता कायदेशीर कचाट्यात सापडले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदेशीर जमाव जमवून रस्ता अडवल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर आणि उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह ३७ जणांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नुकसानभरपाईच्या मागणीसाठी सोमवारी असलदे पेट्रोल पंपाजवळ हे आंदोलन झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप आंदोलकांवर आहे. पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग कळंत्रे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आंदोलनादरम्यान असलदे ते नांदगाव-पाटीलवाडीदरम्यान पदयात्रा काढून सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला होता.
यामध्ये आनंद ढोके, तात्या निकम, हनुमंत म्हसकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील ३७ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
‘टायर’ जाळल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
आंदोलनादरम्यान वागदे-डंगळवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या गोव्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अज्ञात व्यक्तीने चारचाकी वाहनाचे तीन टायर जाळले. या कृत्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि मानवी जीवितास धोका पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, असा ठपका ठेवत पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वैभव नाईक (कणकवली), संदेश पारकर (कणकवली), सुशांत नाईक (कणकवली), स्वस्तिक पाटील (कोल्हापूर), राजेंद्र पाटील (जामसंडे) आणि आनंद ढोके (वाडातर) यांच्यासह देवगड, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावांचा समावेश आहे. प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.