तापमानवाढीचा डोक्याला ‘ताप’!

By Admin | Updated: April 27, 2016 00:55 IST2016-04-26T23:44:29+5:302016-04-27T00:55:07+5:30

डोईवर छत्र्यांचं छत्र : साताराचा पारा चाळिशीवरून हटेना

'Warmth' on the head! | तापमानवाढीचा डोक्याला ‘ताप’!

तापमानवाढीचा डोक्याला ‘ताप’!

सातारा : कुठे धूर निघत असला तर आपण सहज म्हणतो की, कुठे तरी काही तरी पेटतंय! काही पेटल्याशिवाय धूर निघत नाही, हे जसं खरं आहे, तसंच वाढतं तापमान पाहता पृथ्वीला जाळण्याचं काम सुरू आहे, हेच यावरून सिद्ध होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सातारा शहराचं एप्रिल महिन्यातील बहुतांश वेळा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे. मंगळवारी शहरात ४०.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे अनेक समस्या उद्भवल्या असून हा डोक्याचा ‘ताप’ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यातील तापमानाची आकडेवारी पाहिली तर दि. ३० एप्रिल २०१५ या दिवशी सर्वाधिक म्हणजे ३९.९ अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली होती.
इतर दिवसांचे तापमान मात्र ३३, ३४, ३५, ३६ अंशाच्या आसपास फिरत होते. त्यामानाने यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमानानं चाळिशीच्या घरात प्रवेश केला व पुढे पंधरा दिवस तापमानाचा पारा हा ३८, ३९ अंश सेल्सिअस असाच राहिल्याचे दिसते. दि. १५ एप्रिल २०१६ पासून मात्र सातारा शहरातील तापमानानं चाळिशीचं घर काही सोडलेले दिसत नाही. उलट त्यामध्ये वाढच झालेली दिसते. (प्रतिनिधी)


हातातील वस्तू डोक्यावर!
भर उन्हात बाहेर पडलेले अनेक नागरिक आपल्याकडील वस्तूंचा उन्हापासून बचाव होण्यासाठी वापर करतात. मग ती छत्री असेल, बॅग असेल किंवा अन्य कोणतीही वस्तू. घरात डोक्यावर पदर न घेणाऱ्या महिला उन्हात गेल्यावर मात्र डोकं उन्हानं तापू नये म्हणून डोक्यावर पदर घेतात. कुणी कागदपत्रांची पिशवी डोक्यावर ठेवून उन्हाच्या चटक्यापासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी सातारकर नागरिक विविध उपाय करत आहेत. वृद्ध, महिलावर्ग घरातून बाहेर पडताना डोक्यावर छत्री घेतात. तर दुचाकीवरून प्रवास करणारे युवक हेल्मेट, रुमाल, मास्कचा वापर करताना दिसतात. दुचाकी चालविताना युवती मात्र स्वत:ला कपड्यात लपेटून घेत आहेत. स्टोलने डोके व चेहरा झाकून टाकतात आणि डोळ्यांना गॉगल लावतात. कोपरापर्यंतचे हातमोजांचा वापर करतात.

Web Title: 'Warmth' on the head!