झुडपांच्या गर्दीत जागा शोधण्याची वेळ

By Admin | Updated: August 21, 2014 21:10 IST2014-08-21T21:10:05+5:302014-08-21T21:10:05+5:30

शिंदेवाडी : ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही स्मशानभूमी नसल्याची खंत

Time to find places in shrubs | झुडपांच्या गर्दीत जागा शोधण्याची वेळ

झुडपांच्या गर्दीत जागा शोधण्याची वेळ

मुराद पटेल - शिरवळ --आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीची स्मशानभूमीची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. या गावाला स्मशानभूमी शेड नाही, त्यामुळे उघड्यावरच नदीकडेला अंत्यविधी करावे लागतात. याठिकाणी झुडपे वाढल्यामुळे जागा शोधून काढावी लागते.
खंडाळा तालुक्यातील शिरवळजवळ असणाऱ्या शिंदेवाडी गावची लोकसंख्या जेमतेम अडीच ते तीन हजारांच्या आसपास आहे. याठिकाणी गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर नीरा नदीपात्रालगत शिंदेवाडी गावची स्मशानभूमी असून याठिकाणी उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यावेळी मृतदेहावर अग्निसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
नीरा नदीपात्रालगत स्मशानभूमी असल्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रात पाणी वाढल्यानंतर मोठी अडचण निर्माण होते. दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून पार्थिव नेताना खांदेकऱ्यांना नाकी नऊ येते.
याठिकाणी अत्याधुनिक स्मशानभूमी होणे गरजेचे आहे. मात्र अनेक कारणांमुळे हा प्रश्न लालफितीत अडकला आहे. शिंदेवाडी ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही स्मशानभूमीचा प्रश्न बारगळला असल्याने खंत व्यक्त होत आहे.

Web Title: Time to find places in shrubs