Satara: राष्ट्रीय महामार्गबाजुच्या थांब्यावर घोंगावतोय मृत्यू, प्रवासी थांबतात रस्त्यावरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:50 IST2025-11-28T17:49:08+5:302025-11-28T17:50:22+5:30
वडापवाले, प्रवाशांकडून महामार्ग हायजॅक; रात्रीच्या वेळी खासगी बसची खेटाखेटी

Satara: राष्ट्रीय महामार्गबाजुच्या थांब्यावर घोंगावतोय मृत्यू, प्रवासी थांबतात रस्त्यावरच
माणिक डोंगरे
मलकापूर : महामार्गालगतच्या थांब्यांवर ट्रॅव्हल्स, वडाप, खासगी वाहने व महामार्गावरच उभा करून राजरोसपणे प्रवासी घेतात. प्रवासी निम्म्या रस्त्यावर बेजबाबदारपणे उभे राहतात. यामुळे अशा ठिकाणी क्षणाक्षणाला मृत्यू डोक्यावर घोंगावत आहे. या ठिकाणी दिवसातून किमान एक दोन लहान-मोठे अपघात घडतच असतात. आत्तापर्यंत झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे.
कराड व मलकापूर शहराचे प्रवेशद्वारे म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी व किरकोळ अपघातांची नेहमी मालिकाच सुरू असते. कराडलगतचे झपाट्याने वाढणारे शहर म्हणून मलकापूरची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कराडसह मलकापूरमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वाचा : खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट
कोल्हापूर नाक्यासह शिवछावा चौक, कृष्णा रुग्णालय परिसर, मलकापूर फाटा, कोयना वसाहत, नांदलापूर अशा ब्लॅक स्पॉटवर वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी गर्दीतून मार्ग काढताना वाहनधारकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवेश करावा लागतो.
महामार्गावरून जाणारी वाहने भरधाव वेगात असतात. प्रवासी घेण्यासाठी वाहने महामार्गावरच उभा केलेली असतात. प्रवासीही वाहनांची वाट बघत निम्या महार्गावर उभे राहिलेले असतात. त्यामुळे वेगात असलेले वाहन उभ्या राहिलेल्या प्रवाशांच्या घोळक्यात घुसून अनेकवेळा अशा ठिकाणी लहानमोठे अपघात घडले आहेत. महामार्ग व्हीआयपी वडापने तर उपमार्ग स्थानिक वडापने हायजॅक केल्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरूनच यावे जावे लागते. महामार्गावरची सुसाट वाहने उभ्या प्रवाशांच्या घोळक्यात घुसून किंवा प्रवासी घेण्यासाठी थांबलेल्या वाहनावर आदळून अपघात झाले आहेत.
पोलिसांसमोरच राजरोस वडाप
कोल्हापूर नाक्यावर विविध मार्गावर परमीट व बिगर परमीट वडाप करणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात आहेत. ती उपमार्गावर ठाण मांडतात. तर कराडहून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दररोज व्हीआयपी वडापची वाहने महामार्गावरच उभी असतात. दिवसभर याठिकाणी वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसमोरच राजरोसपणे प्रवाशांची चढ-उतार सुरू असते.
रात्रीच्या वेळी खासगी बसची खेटाखेटी
कोल्हापूर नाक्यावर सायंकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत काही कामानिमित्त जायचे म्हटले की अंगावर काटाच उभा राहतो. रात्रीच्या वेळी शेकडो खासगी प्रवासी बस कोल्हापूर नाक्यावरून पुण्या-मुंबईकडे जातात. त्यातील बहुतांशी बस प्रवासी घेण्यासाठी या ठिकाणी थांबतात. यापैकी अनेक बसचालकांनी उपमार्गासह महामार्ग हायजॅक करून थैमान सुरू असते.