साताऱ्यात ढगफुटीने हाहाकार

By Admin | Updated: August 21, 2014 01:00 IST2014-08-21T00:10:36+5:302014-08-21T01:00:56+5:30

पाऊण तासात ८२ मि.मी. : गाड्या बुडाल्या, शेकडो घरांत पाणी शिरले; वाहतूक ठप्प

Storm light in Satara | साताऱ्यात ढगफुटीने हाहाकार

साताऱ्यात ढगफुटीने हाहाकार

सातारा : सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आज, बुधवारी सायंकाळी आकस्मिकपणे ढगफुटी झाली. पाऊण तासात ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम पावसाने मोडीत काढले. धुवाधार कोसळलेल्या पावसाने सातारकरांची दैना उडविली. जोरदार सरींमुळे अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्या बुडाल्या. त्याचबरोबर शेकडो घरांत पाणी घुसले. अनेक रस्त्यांवर तळे साचल्याने कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती.
सातारा शहरात प्रतिताशी १०० मि.मी. दराने सरी कोसळल्या. एका-एका थेंबाचा आकार सरासरी चार ते सात मि.मी. होता. अनेकांच्या घरात पाणी घुसले. शहरातील अनेक रस्त्यांवरून ओढे वाहत असल्यासारखे पाणी वाहत होते. सखल भागामध्ये पाण्याची तळी साचली. या तळ्यांमध्ये चारचाकी वाहने तरंगत होती. डोंगर उतारावरून मुख्य रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यावर चिखल व दगड साचले होते. गेल्या अनेक वर्षांत सातारकरांनी कधी असा पाऊस पाहिला नाही. पाऊस थांबल्यानंतर हजारो सातारकर पाणी पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा न्यायालयाच्या तळघरात पाणी घुसले. शहरातील अनेक भागांत हीच परिस्थिती होती. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Storm light in Satara