अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:57 IST2025-08-19T18:57:31+5:302025-08-19T18:57:52+5:30
इतर पाच तालुक्यात अंदाजानुसार निर्णय घेण्याची सूचना

अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी
सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यातच पश्चिम भागात अतिवृष्टी होत असून हवामान विभागानेही आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यातील शाळा २० आणि २१ आॅगस्ट रोजी बंद ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. तर इतर तालुक्यात पावसाचा अंदाज पाहून निर्णय घेण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. अनेक ठिकाणी पुलावरुन पाणी जाण्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने शाळांना सूचना केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सुचनेनुसार शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला आहे.
अतिवृष्टीमुळे २० आणि २१ आॅगस्ट रोजी पाटण, वाईसह सहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. तर कोरेागव, खटाव, माण, खंडाळा आणि फलटण तालुक्यात पर्जन्यमान पाहून शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे. याबाबत गटविकास अधिकारी निर्णय घेणार आहेत. तर सुट्टी असणाऱ्या दिवसाचे काम हे रविवारी करावे लागणार आहे. तसेच त्याचा अहवाल कार्यालयास सादर करावा लागणार आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सहा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना दोन दिवस सुट्टी देण्यात आलेली आहे. सुट्टीच्या काळात पालकांनी मुलांची काळजी घ्यावी. तसेच पाऊस काळात मुलांना नाले, ओढे ओलांडून शाळेत यावे लागत असेल तर अशा ठिकाणीही व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने शाळेला सुट्टी द्यावी. - अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी प्राथिमक विभाग