Satara: मित्राचा त्रास ऐकून 'तो' गहिवरला, विट्यातल्या शाळकरी जिवलग मित्रांनी सोडलं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:14 IST2026-02-17T16:13:36+5:302026-02-17T16:14:16+5:30
‘त्या’ दोघांबाबत घडलेली घटना विचार करायला लावणारी, कराड पोलिस ठाण्यात मांडली कैफियत

संग्रहित छाया
कराड : एकमेकांसोबत दररोज शाळेत जाणारे आणि शाळा सुटल्यावर एकत्र खेळणारे विट्यातील ते दोघे जिवलग मित्र... मग एकाला घरच्यांकडून त्रास सुरू होतो. त्या त्रासाची माहिती तो दुसऱ्या मित्राला देतो मग दुसरा त्याला होणारा त्रास ऐकून व्याकुळ झाला. आणि दोघेही घरातील कपडे बॅगेत भरून विट्याहून थेट कराड गाठतात. पुढे पळून जाणार इतक्यात त्यांना कराड शहर पोलिसांच्या स्वाधीन केले जाते. आणि त्यानंतर ते पोलिसांपुढे आपली कैफियत मांडतात.
घडलं असं की, विट्यात नववीत शिक्षण घेत असलेले दोघे मित्र सोमवारी सकाळी विट्याहून थेट कराड येथे पळून आले. त्यातील एकाने कराड शहरातील बिरोबा मंदिर येथील कपड्याचे दुकानामध्ये बसलेल्या कार्वे येथील सुरेश थोरात यांच्याकडे काही काम आहे का? अशी विचारणा केली. दोन मुले कामाबाबत विचारणा करत असल्याने थोरात यांना संशय आला. तसेच त्यांना मुलांची काळजीही वाटली. काळजीपोटी त्यांनी मुलाची चौकशी करत त्यांना धीर दिला आणि दोघांबाबत कराड पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर दोघांना कराड पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यातील एकाने काकाकडून वारंवार मारहाण होत असल्याने आपण पळून आल्याचे सांगितले. पोलिसांनीदेखील त्या दोघांची कैफियत ऐकून घेत धीर दिला आणि कुटुंबीयांना फोन करून दोघेजण कराड येथे असल्याची माहिती दिली. तसेच कराड पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना केल्या.
‘त्या’ दोघांबाबत घडलेली घटना विचार करायला लावणारी...
इयत्ता नववीत शिक्षण घेणारे दोघे अल्पवयीन मित्र त्यातला एक काकाकडे राहत असल्या कारणाने त्याला काकाकडून मारहाण होत असे. तो त्याच्या मित्राला मारहाणीबाबत सांगतो आणि आपल्या मित्राला कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासापासून त्याची सुटका व्हावी म्हणून मैत्रीखातर दुसराही त्याच्यासोबत पळून जाण्याचा विचार करतो. खरोखरच ही घटना विचार करायला लावणारी आहे.
कराड शहरात दुकानात बसलेलो असता विट्यातून दोन अल्पवयीन मुले माझ्याकडे आली. त्यांनी काही काम आहे का? अशी विचारणा केली, त्यांना धीर दिला. एक माणुसकीच्या नात्याने दोघांना पोलिस ठाण्यात आणून सुखरूप पोहोच केले. - सुरेश थोरात, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, कार्वे, ता. कराड