Satara Crime: तब्बल ९२ तोळे सोने लंपास करुन जंगलात लपून बसले, पोलिसांनी ड्रोनने शोध घेऊन जेरबंद केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:47 IST2025-08-30T16:45:00+5:302025-08-30T16:47:21+5:30
संशयितांकडून बनाव

Satara Crime: तब्बल ९२ तोळे सोने लंपास करुन जंगलात लपून बसले, पोलिसांनी ड्रोनने शोध घेऊन जेरबंद केले
सातारा : वराडे (ता. कराड) येथे एसटीमधील प्रवाशांवर ३० जुलै रोजी तलवार हल्ला करून तब्बल ९२ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याच्या गुन्ह्याचा सातारा एलसीबीने छडा लावला आहे. माळशिरसजवळ भालधोंडीच्या घनदाट जंगलात लपून बसलेल्या चार संशयितांना पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने शोधून जेरबंद केले. त्यांच्याकडून ७६.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राहुल दिनेश शिंगाडे (शिंगणापूर, ता. माण), महावीर हणमंत कोळपे (बिबी, ता. फलटण), अभिजीत महादेव करे (रावडी, ता. फलटण) व अतुल महादेव काळे (भांब, ता. माळशिरस) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्या म्हणाल्या, कोल्हापूरमधील कुरिअर कंपनीचा कर्मचारी कोल्हापूर-मुंबई बसमधून प्रवास करत होता. त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या सहा संशयितांपैकी एकजण एसटीने, तर उर्वरित पाचजण दोन कारमधून पाठलाग करत होते. वराडे येथे एका हॉटेलजवळ एसटी थांबल्यानंतर संशयितांनी एसटीत जाऊन त्या कर्मचाऱ्यास मारहाण केली व त्याच्याजवळील ९२ तोळे सोन्याचे दागिने व ३२,५०० रुपये रोख असलेली बॅग लुटून संशयित पळून गेले.
मात्र, एका चोररट्यास पकडले होते. याप्रकरणी तळबीड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढे स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती मिळवली. आरोपी भांब, ता. माळशिरस येथील परिसरातील घनदाट भालधोंडीच्या जंगलात लपल्याचे कळाले. आरोपींचा ठावठिकाणा समजण्यासाठी ड्रोनचाही वापर केला. अखेर संशयित लपलेल्या ठिकाणी पोलिस पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
तथापि, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९२ ताळे सोने, ३२ हजार रोकड व गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार व मोबाईल असा एकूण अंदाजे ७६.९४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक रोहित कर्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर यांच्यासह टीमने केली.
संशयितांकडून बनाव
कुरिअर कर्मचाऱ्याला मारहाण करून बॅग घेऊन पळालेल्या चोरट्यास काही प्रवाशांनी पकडले. या धांदलीत संशयितांनीही चोराला पकडल्याचा बनाव केला व चोरट्याकडून सोने असलेली बॅग घेऊन ते पसार झाले.
घनदाट जंगलात पोलिसांचा सात दिवस मुक्काम
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी भालधोंडीच्या जंगलात सात दिवस मुक्काम केला. रात्री लांडगे व तरसांचे दर्शन होत, पण सुमारे शंभर ते दीडशे एकरच्या झाडीत चोरटे नजरेस पडत नव्हते. चोरटे जेवणाचा डबा घेऊन लपलेल्या ठिकाणी गुपचूप जाऊन बसत होते. अखेर ड्रोन कॅमेऱ्यात चोरटे जात असल्याचे दिसून आले.
एक संशयित कुरिअरमध्ये कामाला
महावीर कोळपे हा कृष्णा कुरिअर येथे नोकरीस होता. त्याला कुरिअर कंपनीचा कर्मचारी सोन्याचे दागिने कधी घेऊन जातो हे माहीत होते. त्यानेच संपूर्ण दरोड्याची योजना आखली.