डोक्याला पिस्तूल लावून साताऱ्यात लुटमार, एकास पुण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:30 IST2025-11-20T18:28:56+5:302025-11-20T18:30:22+5:30
हल्लेखोर साताऱ्यातून पसार झाले होते

डोक्याला पिस्तूल लावून साताऱ्यात लुटमार, एकास पुण्यात अटक
सातारा : एका तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून मारहाण करत त्याच्या खिशातील ३० हजार रुपये लंपास करणाऱ्या टोळीतील आरोपीला पुणेपोलिसांनी पुण्यात अटक केली. निखील अशोक काळे (वय २२, रा. कोडोली, सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत रणजित नवनाथ कसबे (वय ३०, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याने ८ नोव्हेंबर रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. रणजित कसबे हा ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता येडाई मंदिरात आरतीसाठी गेला होता. आरती सुरू होण्यापूर्वी मंदिराजवळ लल्लन जाधव, निखील काळे, वाढीव व त्यांचे ७ ते ८ साथीदार आले.
लल्लन जाधव हा कसबे याला म्हणाला, मी फरारी आहे. मला खर्चासाठी आताच्या आता ५० हजार रुपये दे, नाहीतर मी तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर लल्लन जाधव याने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले. गळ्यातील सोन्याची चेन ओढून तोडली. अर्धी चेन काढून घेतली. सर्वांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या अंगातील शर्ट काढून खिशातील ३० हजार रुपये काढून घेतले. वाढीव नावाच्या मुलाने चाकू त्याच्या चेहऱ्याच्या दिशेने फिरविला. तो त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली लागून त्याला दुखापत झाली.
सातारा शहर पोलिस ठाण्यात सात ते आठ जणांवर दरोडा, खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर हल्लेखोर साताऱ्यातून पसार झाले होते. त्यापैकी निखील काळे हा स्वारगेट बसस्टँड परिसरात फिरत होता. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर साताऱ्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी त्याला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.