पावसाने धरणे भरली; पण सातारा जिल्ह्यात मान्सूनमध्ये घट झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:43 IST2025-10-04T15:42:59+5:302025-10-04T15:43:26+5:30
सरासरी ७८४ मिलिमीटर पर्जन्यमान नोंद

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता थांबला आहे. आतापर्यंतच्या चार महिन्यांच्या मान्सूनच्या काळात जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे आणि पाझर तलावही भरुन वाहत आहेत. पण, यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सुमारे १२ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. सरासरी ७८४ मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनचा पाऊस पडतो. याची सरासरी ही ८८६ मिलिमीटर इतकी आहे. या पावसावरच वर्षाचे गणित अवलंबून असते. शेती, पिण्याच्या पाणी योजनांसाठी हा पाऊसच महत्वपूर्ण ठरतो. एखाद्यावर्षी पाऊस कमी पडलातरी त्याचा शेती आणि पिण्याच्या पाणी योजनांवरही मोठा परिणाम होतो. यंदा मात्र, मान्सूनचा पाऊस कमी पडला आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या दरम्यान सरासरी ८८६ मिलिमीटर पर्जन्यमान होते. यावर्षी मात्र ७८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सुमारे ८८ टक्के पाऊस झालेला आहे. यामध्ये जून महिन्यातच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला असला तरी तो सरासरीएवढा पडला नव्हता. त्यामुळे मान्सूनच्या हंगामात जिल्ह्यात १२ टक्के पावसाची तूट राहिलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.
मागील वर्षी १२६ टक्के पाऊस..
मागील वर्षी जून महिन्यात मान्सूनला सुरुवात झाली होती. चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १ हजार १२४ मिलिमीटर पर्जन्यमान नोंद झाले होते. याची सरासरी १२६ टक्के इतकी होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३८ टक्के कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
चार तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षी कमी..
जिल्ह्यात सप्टेंबरअखेर सरासरी ७८४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. ८८ टक्के हा पाऊस आहे. तसेच जिल्ह्यातील चार तालुक्यांत सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे. तर सात तालुक्यात अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये सातारा तालुक्यात सरासरीच्या ९५ टक्के पर्जन्यमान झाले आहे.
जावळीत १०६ टक्के, पाटण ६०, कराड १०५, कोरेगाव तालुका ९२ टक्के, खटाव १२८, माण १२३, फलटण १०७, खंडाळा तालुका १०८, वाई ११४ आणि महाबळेश्वर तालुक्यात सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झालेला आहे. यावरून पावसाचे तालुके समजल्या जाणाऱ्या सातारा, पाटण, महाबळेश्वरमध्ये पर्जन्यमान कमी झाल्याचेही स्पष्ट झालेले आहे.