कोयनेत पावसाचा जोर

By Admin | Updated: July 16, 2014 22:54 IST2014-07-16T22:50:40+5:302014-07-16T22:54:59+5:30

जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार : चोवीस तासांत अडीच टीएमसी पाणीसाठा

Rainfall in Koyne | कोयनेत पावसाचा जोर

कोयनेत पावसाचा जोर

पाटण/महाबळेश्वर/कोयनानगर : कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. अवघ्या चोवीस तासांत कोयना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला. आज, बुधवारी दिवसभर पाऊस झाल्याने तालुक्यातील दुर्गम भागांतील संपर्क तुटला. कोयना धरणात १७.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरूच आहे.
दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणातील पाणीपातळी २०४९ फूट इतकी झाली आहे. वेगाने वाहणारे वारे व मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील डोंगरावरील गावे आज, बुधवारी काही काळ संपर्कहीन झाली. कोयना व चांदोली अभयारण्यातही जोरदार पाऊस सुरू असल्याने जंगलातील ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे पांढरेपाणी, मळे-कोळणे, आटोली, चाफेर, नाव, बाहे, पाचगणी, आंबेघर, हुंबरणे या गावांचा संपर्क तुटला.
पाटण तालुक्यातील मोरणा, तारळी, काफना, वांग, केरा या नद्यांना आज, बुधवारी पूर आला. कोयना नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. हवेत गारठा निर्माण झाला आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक १६,३८५ क्युसेक प्रतिसेकंद इतकी वाढली आहे.
दरम्यान, महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची संततधार कायम असून, वेण्णा लेकच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी वृक्ष कोसळले. आंबेनळी घाटात दरडी कोसळत आहेत.
गेल्या ३६ तासांत झालेला पाऊस : कोयना -२२५, नवजा-५७, महाबळेश्वर - १८०, सातारा -१४.९, जावळी-४१, कोरेगाव-५.४, कऱ्हाड- ८.५, पाटण-३६.६, फलटण-०.३, माण-०.४, खटाव-२, वाई-१०.९, खंडाळा-१.९ मि.मी. (प्रतिनिधी, वार्ताहर)

Web Title: Rainfall in Koyne