Satara: चर्चा निष्फळ; ऊसदर आंदोलक रात्रभर झोपले कारखान्याच्या वजन काट्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:57 IST2025-12-03T20:56:58+5:302025-12-03T20:57:07+5:30
संघटना व शेतकऱ्यांनी टनाला ऊसदर ३५०० रुपये मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली होती

Satara: चर्चा निष्फळ; ऊसदर आंदोलक रात्रभर झोपले कारखान्याच्या वजन काट्यावर
विकास शिंदे
फलटण : फलटण येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची ऊस दर चर्चा निष्फळ ठरल्याने सर्व शेतकरी बांधवांनी रात्रभर वजनकाट्यावर व कारखाना परिसरात झोपणे पसंत केले. साेमवार सकाळपासून शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी टनाला ऊसदर ३५०० रुपये मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली होती. दिवसभर मागण्या मान्य न झाल्याने शेतकरी थेट वजन काट्यावर झोपले.
शेतकऱ्यांनी वजन काटा ताबा घेऊन कारखाना बंद पाडला. श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यास विनंती केली, परंतु सर्व शेतकऱ्यांना ३३०० दर अमान्य असून ३५०० चा दर निश्चित करावा व तसे लेखी पत्र द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. या आंदोलनाला कारखान्याच्या कामगार संघटनेने पाठिंबा देत कारखाना प्रशासन व शेतकरी यांच्यात मध्यस्थी केली.
पुढील आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कारखाना प्रशासनातर्फे अजित जगताप यांनी दिल्यावर व कामगार संघटनेनी जबाबदारी घेतल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. ३५०० रुपये ऊसदर न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष अमरसिंह कदम, सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे, पक्ष फलटण तालुकाध्यक्ष दादा जाधव, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, नाना शिपकुले, सूरज साळुंखे व तालुक्यासह साखरवाडी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते