Satara: झाडातून अचानक आडवा आलेला पादचारी कारच्या धडकेत ठार, वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाली पलटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:17 IST2025-10-13T17:16:37+5:302025-10-13T17:17:32+5:30
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली

छाया : माणिक डोंगरे
मलकापूर : पादचारी झाडातून अचानक आडवा आल्याने पादचाऱ्याची धडक होऊन कार दुभाजकात पलटी झाली. या अपघातात पादचारी ठार झाला, तर कारचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर-पुणे लेनवर वाठार गावच्या हद्दीत वाठार गावच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पोलिसांकडून व अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक (एमएच १४ जीएच ०५९०) कोल्हापूरकडून पुण्याकडे निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाठार गावच्या हद्दीत आले असता, महामार्ग ओलांडण्यासाठी झाडीतून पादचारी अचानक आडवा येऊन कारला धडकला. पादचाऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकात जाऊन पलटी झाली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला, तर कारचे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच सुनील कदम, शुभम शिंदे, राहुल कदम, दस्तगीर आगा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी पादचाऱ्याला प्रफुल्ल बाबर यांच्या रुग्णवाहिकेतून तातडीने कृष्णा रुग्णालयात पाठवून दिले. मात्र, उपचारापूर्वीच त्या पादचाऱ्याचे निधन झाले होते. अपघाताची माहिती कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.