लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर गजाआड

By Admin | Updated: November 1, 2015 23:46 IST2015-11-01T23:46:35+5:302015-11-01T23:46:35+5:30

महामार्गावरील घटना : चौघांना महिन्यापूर्वीच झाली होती अटक

The leader of the robber's gang is finally gone | लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर गजाआड

लूटमार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर गजाआड

सातारा : महामार्गावर ट्रकचालकांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारास बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आल्याने लूटमारीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेश चंद्रकांत चव्हाण (वय २२, रा. मेघदूत कॉलनी, देगाव फाटा, सातारा) असे या म्होरक्याचे नाव आहे. सुमारे महिनाभर पोलिसांशी लपंडाव खेळल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा तो पोलिसांच्या हाती सापडला. सामान्यत: राज्याबाहेरील ट्रक अडवून चालक-क्लीनरला मारहाण करणे आणि त्यांच्याकडील रोकड आणि ऐवज घेऊन पोबारा करणे, ही या टोळक्याची कार्यपद्धती होती.
यासंदर्भात दि. १ आॅक्टोबर रोजी चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. तमिळनाडूतील ट्रक (टीएन २८ एम १४९४) घेऊन जात असलेल्या वरदराज वरदराजन (वय ४५, रा. ओरेट्टीपट्टी, तमिळनाडू) या चालकाला ट्रकच्या केबीनमधून बाहेर ओढून त्याच्याजवळील एक हजारांची रक्कम आणि मोबाइल या टोळक्याने काढून घेतली होती. गस्तीवरील पोलिसांना माहिती मिळताच वेगाने चक्रे फिरली आणि आपल्या दोन मोटारसायकली घटनास्थळीच सोडून संशयितांना पळ काढावा लागला होता.
त्याच रात्री जगन्नाथ बबन झोरे (वय २०, रा. निवकणे, ता. पाटण), संतोष तुळजाराम खोत (वय २३, रा संख, ता. जत, जि. सांगली), अमित शंकर शिंदे (वय २५, रा. मायणी, ता. खटाव) आणि अजित गोरखनाथ धनवडे (वय २१, रा. शिवाजीनगर, शेंद्रे) या चौघांना अटक करण्यात आली होती. गणेश चव्हाण या टोळीचा म्होरक्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते; मात्र या घटनेनंतर तो पसार झाला होता. त्याला अटक झाल्याने अनेक गुन्ह्यांची माहिती मिळणे शक्य होईल, असा पोलिसांचा कयास आहे. (प्रतिनिधी)
गस्ती पथकामुळे पर्दाफाश...
एक आॅक्टोबरच्या रात्री अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक हेमराज साठे यांच्यासह गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केल्याने चारजण हाती लागले होते. त्यावेळी रजेवर असतानाही गुन्ह्याची माहिती मिळताच ड्यूटीवर हजर झालेले वाहतूक शाखेचे कर्मचारी विनायक मनवी यांनी चौघांपैकी तिघांना पकडून दिले होते.
सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
शुक्रवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर गणेश चव्हाणला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि. २) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: The leader of the robber's gang is finally gone