कोयना धरणाचे दरवाजे बंद, सातारा जिल्ह्यात घाट, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:23 IST2025-07-25T18:22:29+5:302025-07-25T18:23:42+5:30
तारळीतून २ हजार क्युसेक विसर्ग, नवजाला १६६ मिलीमीटरची नोंद

कोयना धरणाचे दरवाजे बंद, सातारा जिल्ह्यात घाट, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तारळी धरणातून ही २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर २४ तासांत नवजाला १६६ आणि महाबळेश्वरमध्ये १३७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तसेच प्रमुख ६ धरणांत सुमारे ११४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. मागील काही दिवसांपासून कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून विसर्ग करण्यात येत होता. पण, गुरूवारी (दि.२४) धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. पश्चिम भागात १० दिवसानंतर दमदार पाऊस कोसळू लागला आहे. विशेषतः करुन घाट भाग आणि धरणक्षेत्रात ही धो-धो पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात ही मोठी आवक होऊ लागल्याने पाणीसाठा वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ८७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर नवजा येथे १६६ आणि महाबळेश्वरमध्ये १३७ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
सकाळच्या सुमारास धरणात २० हजार ७४९ क्युसेक वेगाने पाणी येत हाेते. तर धरणात ७८.३७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ७४.४६ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. तर २४ तासांत कोयना धरणात १.८० टीएमसी पाणी आले. तर धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. यामुळे सध्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेकच विसर्ग सुरू आहे.
पश्चिम भागातच कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलाय. धोम क्षेत्रात १९, बलकवडी ६५, उरमोडी धरणक्षेत्रात ३३ आणि तारळी येथे २२ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. या धरणात सध्या ११३.८० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सुमारे ७७ टक्के ही धरणे भरली आहेत.
दरम्यान, सातारा शहरासह तालुक्यातही पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे. तर पूर्व भागात पावसाच्या झडी येत आहेत. यामुळे पूर्व भागात खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे.
कोयना धरणाचे दरवाजे बंद..
मागील काही दिवसांपासून कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून विसर्ग करण्यात येत होता. पण, गुरूवारी दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू आहे. तर तारळी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सुमारे २ हजार क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास प्रमुख ४ धरणांतून ३ हजार ८७१ क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता.