Pune-Bangalore Highway: खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:09 IST2025-11-28T17:33:07+5:302025-11-28T18:09:25+5:30
अपघातांमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे

Pune-Bangalore Highway: खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट
मोहित देवधर
खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा परिसर अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. पुणे बाजूकडे जाताना खंबाटकी बोगदा ते केसुर्डी फाटा, सातारा बाजूकडे जाताना केसुर्डी फाटा ते खंबाटकी घाट या टप्प्यांमध्ये वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. इतके अपघात, इतके मृत्यू, नुकसान होऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आजही परिस्थिती बदलली नाही. सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना मात्र या परिसरातून प्रवास करणे कठीण झाले आहे.
या थांब्यांवर दुर्घटनेचे सावट
खंडाळ्यात महामार्गावर पुणे स्टॉप, सातारा स्टॉप त्याचप्रमाणे शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील लोणंद स्टॉप या ठिकाणच्या थांब्यांवर प्रवाशांच्या उभ्या असलेल्या गर्दीमुळे व त्या ठिकाणी प्रवाशांसाठी नसलेल्या सोयीमुळे अपघाताची परिस्थिती अनेकदा निर्माण होत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी महामार्गावर पुणे स्टॉपवर झालेल्या अपघातामध्ये एकाच वेळी नऊजण मृत्युमुखी पडले होते.
वाचा : राष्ट्रीय महामार्गबाजुच्या थांब्यावर घोंगावतोय मृत्यू, प्रवासी थांबतात रस्त्यावरच
या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सर्व थांब्यांची व्यवस्थित निर्मिती होणे अपेक्षित आहे. यामध्ये खंडाळ्यामधील पुणे स्टॉप व सेवारस्त्याची साइड पट्टी यामध्ये तब्बल दोन फूट खोलीचे अंतर आहे. त्यामुळे किरकोळ अपघात अनेकदा या ठिकाणी होत असतात.
अपघातांची मुख्य कारणे..
- बोगद्याबाहेर तीव्र उतार
- रॅम्बलरमुळे दुचाकी अनियंत्रित होते
- बेशिस्त अवजड वाहनचालक वाहन न्यूट्रल करतात
- एस कॉर्नर परिसरात सतत पडणारे खड्डे
- कालवा परिसरात अपुरा रस्ता
- रात्री अंधारात रस्त्याचा अंदाज येत नसल्याने
- बोगद्याबाहेरील परिसरात दरडी कोसळल्याने रस्त्यावर येणाऱ्या छोट्या दगडांमुळे
वाचा : काळजला महामार्गाच्या कडेलाच भरते मंडई
काय करता येईल?
- नवीन बोगदा व पुलाचे काम लवकर पूर्णत्वास आणणे; पण तोपर्यंत जुन्या मार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत या उपायोजना करता येऊ शकतात.
- बोगद्याबाहेरील परिसरात स्पीड गन बसवून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर दंड करणे
- धोकादायक रॅम्बलर काढणे
- रस्त्याच्या कडेला सांडलेली खडी, कच, गवत काढून रस्ता पूर्ण क्षमतेने वापरात यावा.
- अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी शासकीय ॲम्ब्युलन्स व क्रेन उपलब्ध ठेवाव्यात
वाचा : उंब्रजचा भराव पूलच बनलाय बेकायदा ‘प्रवासी थांबा’
नवीन बोगदा पूर्णत्वास येणार कधी?
खंबाटकी बोगद्याबाहेर असलेला तीव्र उतार व एस वळणाने आजपर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. यावर उपाय म्हणून नवीन बोगदा व एस कॉर्नर सरळ करण्यासाठी भल्यामोठ्या पुलाचे काम सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्णत्वास आलेले नाही. या ठिकाणी अपघात होऊन नागरिकांची आर्थिक, शारीरिक, मानसिक हानी मोठ्या प्रमाणावर होत असतानाही ‘एनएचएआय’ महामार्ग प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून अगदी मदमस्त भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
काम महामार्गाचे अन् डोकेदुखी पोलिसांना
राष्ट्रीय महामार्ग प्रशासन नवीन बोगदा व पुलाचे कित्येक वर्षे सुरू असलेले काम अद्यापपर्यंत पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. या ‘ब्लॅक स्पॉट’ पट्ट्यामध्ये शेकडो अपघात महामार्गावर नियमितपणे होत आहेत. अपघातानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत करेपर्यंत खंडाळा, भुईंज पोलिस, महामार्ग पोलिसांना अहोरात्र झटावे लागते. पोलिस प्रशासनाला कित्येकदा रात्री-अपरात्री अपघातामुळे झालेल्या वाहतूक खोळंब्यावेळी तहानभूक विसरून काम करावे लागते. या सर्व घटनांमध्ये प्रशासनाला शिरवळ रेस्क्यू टीम या आपत्कालीन संघटनेचेही मोलाचे सहकार्य लाभते.
भीषण अपघाताबाबत आकडेवारी
वर्ष - अपघात - मृत - जखमी
- २०२२ - २४ - १३ - १७
- २०२३ - १९ - १८ - १८
- २०२४ - १३ ०७ - १३
- २०२५ - २२ - ०४ - २९