पालकमंत्र्यांचा रोख कोणावर?

By Admin | Updated: January 13, 2015 00:09 IST2015-01-12T22:34:27+5:302015-01-13T00:09:42+5:30

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या कानपिचक्या नक्की कोणत्या अधिकाऱ्यांसाठी होत्या, याचीच चर्चा सुरू झाली आहे.

Guardian minister's cash? | पालकमंत्र्यांचा रोख कोणावर?

पालकमंत्र्यांचा रोख कोणावर?

सातारा : सातारचे नूतन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात पहिलीच बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून राजकारण केले जात असल्याचा जाहीर आरोप केला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या कानपिचक्या नक्की कोणत्या अधिकाऱ्यांसाठी होत्या, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून खुर्च्या अडवून बसलेल्या अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये, असे पालकमंत्र्यांनी थेट भाषेत सांगितले. ‘काँगे्रस व राष्ट्रवादीच्याच लोकप्रतिनिधींचे ऐकायचं, बाकी कुणाची कामे करायची नाहीत, हे आता चालणार नाही. जो जास्त काळ एकाच ठिकाणी असेल; पण तो प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्याला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. पण कुणी जाणीवपूर्वक राजकारण करत असेल तर त्यांच्या बदल्या निश्चित आहे,’ असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.
‘दादागिरी करणे, कामात अडथळे आणणे, आमदारांच्या दबावानुसार वागणे, असं करत राहाल तर बदली ठरलेलीच आहे,’ असंही पालकमंत्री म्हणाले.
दरम्यान, पालकमंत्री पहिल्याच बैठकीत असं म्हणाल्याने अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली असणार, यात शंकाच उरलेली नाही. पण पालकमंत्री नेमके कुठल्या अधिकाऱ्यांबाबत बोलले याची उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. काही अधिकारी वर्गातच आपण किती वर्षे एकाच ठिकाणी आहे, याची मोजदाद सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे सर्व नव्याने दाखल झालेले अधिकारी आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त गुळाला चिटकून राहिलेल्या मुंग्यांसारखे अनेक अधिकारी आहेत. आता हे अधिकारी कोण हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
लोकाभिमुख आणि वेगवान प्रशासकीय कामासाठी पालकमंत्री आग्रही आहेत. ही कामे झाली नाहीत तर येत्या काही दिवसांतच पालकमंत्र्यांची गर्जना ‘भीष्म प्रतिज्ञा’ म्हणून समोर येईल, हे मात्र नक्की दिसत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Guardian minister's cash?