Satara Crime: आलिशान गाडी विकून त्याच गाडीची चोरी करणारी टोळी उघड; एकास अटक, दोघांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:55 IST2025-11-21T17:54:26+5:302025-11-21T17:55:27+5:30
दोन महिने पोलिसांची मोहीम

Satara Crime: आलिशान गाडी विकून त्याच गाडीची चोरी करणारी टोळी उघड; एकास अटक, दोघांचा शोध सुरू
सातारा : महागड्या गाड्या बनावट कागदपत्रांवर विकून त्याच गाड्या जीपीएस ट्रॅकरने शोधून पुन्हा चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा सातारा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी मोहित मोतीलाल मिनेकर (वय २५, रा. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास अटक केली आहे. तर युवराज रामचंद्र जाधव (४२, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) व रुक्साना मोहित मिनेकर (२२, रा. पाचगाव) यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ एप्रिल २०२५ रोजी लग्न कार्यक्रमाच्या बहाण्याने संशयिताने फिर्यादीकडून आलिशान गाडी ताब्यात घेतली होती; परंतु गाडी परत करण्यास तो टाळाटाळ करत होता. त्यामुळे फिर्यादीने गाडीबाबत इतरांकडे चौकशी केली. यावेळी त्याने कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातील निपाणी, चिकोडी, गदग परिसरात अनेकांना गाडी विकल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सातारा शहर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
यानंतर शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करत आजरा (जि. कोल्हापूर) येथे शेडमध्ये लपवून ठेवलेली कार शोधून जप्त केली. यानंतर पाचगाव येथील एका घरातून त्यास ताब्यात घेतले. अन्य दोघांचा पोलिस शोध आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक श्याम काळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजीत भोसले, नीलेश यादव, नीलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते आदींनी केली.
अशी होती मॉडस ऑपरेंटी
- अलिशान गाडीसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे.
- अडचण असल्याचे सांगून कमी दरात गाडी विकणे.
- विक्रीनंतर १ ते २ दिवसांनी जीपीएस ट्रॅकरने गाडी शोधून रात्री बनावट चावीने पुन्हा चोरणे.
दोन महिने पोलिसांची मोहीम
शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने सांगली, कोल्हापूर, निपाणी, गदक, चिकोडी (राज्य कर्नाटक) अशा ठिकाणी दोन महिने गाडी व आरोपींचा शोध घेतला. अखेर आजरा येथे गाडी मिळाली. आरोपी निवासस्थाने बदलत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता. तोही पाचगाव येथे एका घरात सापडला. त्याच्या पत्नीनेही गुन्ह्यात मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सराईतांवर दोन जिल्ह्यांत गुन्हे दाखल
संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपुरी, शाहूवाडी तसेच सांगली जिल्ह्यातील विटा पोलिस ठाण्यात यापूर्वी त्याच्यावर गंभीर गुन्हे नोंद आहेत.