साताऱ्यात मोबाइल चोरणारी टोळी गजाआड, झारखंडच्या चौघांसह पाच जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:41 IST2025-09-03T15:41:07+5:302025-09-03T15:41:33+5:30
भाजी मंडईतील चोरीचे १२ मोबाइल हस्तगत

साताऱ्यात मोबाइल चोरणारी टोळी गजाआड, झारखंडच्या चौघांसह पाच जण अटकेत
सातारा : शहरात भाजी मंडईमध्ये नागरिकांचे मोबाइल हातोहात चोरणाऱ्या झारखंडच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे १२ मोबाइलपोलिसांनी हस्तगत केले.
जगदीश रामप्रसाद महतो (वय ३२), अजित कुमार सुरेश मंडल (२४), रोहित कुमार सियाराम महतो (२५), अर्जुन राजेश मंडल (२०, सर्व रा. महाराजपूर, जि. सहाबगंज, झारझंड), शोयेब मस्तानसाहब शेख (२४, रा. सलगरापुरा, ता. मुखेड, नांदेड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सातारा शहरातील भाजी मंडईमध्ये एकाच दिवशी पाच ते सहा जणांचे मोबाइल चोरीस गेले होते. या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांचे एक पथक राधिका सिग्नल भाजी मंडईजवळ मंगळवारी वाॅच ठेवून होते. त्यावेळी पोलिसांना एक संशयित कार दिसली. त्या कारला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार थांबली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने कारचा पाठलाग करून वाढेफाटा येथे ती कार थांबविली.
सर्व संशयितांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ महागडे १२ मोबाइल आढळून आले. हे सर्व मोबाइल त्यांनी साताऱ्यातील भाजी मंडईमधून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आराेपींकडून कारसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मोबाइल चोरीचे त्यांच्याकडून एकूण सात गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे, अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, जयवंत घोरपडे, महिला पोलिस कोमल पवार आदींनी या कारवाईत भाग घेतला.
नागरिकांमधून समाधान..
भाजी खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे अचानक मोबाइल चोरीस गेल्याने नागरिक हतबल झाले होते. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने मोबाइल चोरणारी टोळी पकडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.