Satara: खंबाटकी बोगदा प्रकल्पासाठीच्या चार टन स्टीलची चोरी, चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 16:21 IST2025-08-04T16:20:54+5:302025-08-04T16:21:58+5:30
खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Satara: खंबाटकी बोगदा प्रकल्पासाठीच्या चार टन स्टीलची चोरी, चौकशीची मागणी
खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळ्यात खंबाटकी बोगदा व उड्डाणपुलाच्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रकल्पामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत आहेच. अशातच या प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या मालाच्या ट्रेलरमधून तीन लाखांचे तब्बल चार टन स्टील गायब असल्याचे निदर्शनास आल्याने या स्टील चोरीबाबत खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये रविवारी (दि.२७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडाळ्यातील प्रकल्पावर एका ट्रेलरमधून (एमएच ४६ बीयू ०६६८) २५ एमएमचे स्टीलचे बार आले होते. या मालाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता काही माल नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत ट्रेलरचालक नितीन हरीश खुपसे (रा. पुसेगाव) याला विचारणा केली असता चालकाने माहिती देण्यास टाळाटाळ केली व काही वेळांनंतर लोकांचे दुर्लक्ष असताना स्टीलच्या मालासह ट्रेलर घेऊन पसार झाला. हाच चालक दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास ट्रेलर घेऊन आला.
यावेळीही उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ट्रेलरमधील मालाला चिखल लागला असल्याने आधी माल काढून पुन्हा तो भरून आणल्याचे निदर्शनास आले. वाहनांमधून स्टील चोरी होत असल्याचा संशय आल्याने शनिवारी आलेल्या दुसऱ्या ट्रेलरमधून (एमएच ४६ बीयू २५८३) उतरविलेल्या मालाची पडताळणी केली असता यामध्ये तीन लाखांचे तब्बल चार टन स्टील चोरी झाल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांनी तत्काळ खंडाळा पोलिस ठाणे गाठत घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली.
याप्रकरणी प्रोजेक्ट मॅनेजर प्रकाश जाधव यांनी खंडाळा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ट्रेलरचालक तुकाराम संभाजी लोंढे (रा. पुसेगाव) याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस अंमलदार दत्ता दिघे हे करीत आहेत.
बोगद्याच्या कामावर मोठ्या प्रमाणात गडबड ?
खंबाटकीचा नवा बोगदा व उड्डाणपूल कामाच्या प्रकल्पावरून आजपर्यंत लाखो रुपयांचे स्टील व इतर साहित्याची चोरी झाली असून, यामध्ये प्रकल्पातीलच अनेक अधिकारी, कर्मचारी सामील असल्याने हे प्रकार समोर येत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्वच एक असल्याने ‘आळीमिळी गुपचिळी’ सारखी परिस्थिती असून, प्रशासनाने कडक तपास करावा, अशा भावना परिसरातून व्यक्त होत आहेत.