फटाक्यांच्या ठिणगीची किंमत पडली अडीच लाखांना, साताऱ्यात अज्ञातावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:36 IST2025-10-07T15:34:54+5:302025-10-07T15:36:16+5:30
प्लबिंगच्या दुकानातील साहित्य जळून खाक

संग्रहित छाया
सातारा : दुकानासमोर लावलेल्या फटाक्यांच्या माळेतील एक ठिणगी अडीच लाखांना पडली. या ठिणगीमुळे दुकानात आग लागून दुकानातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी (दि. ५) राधिका रस्त्यावर घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अरुणकुमार जेठालाल पटेल (वय ४०, रा. संगम माहुली, ता. सातारा) यांचे राधिका रस्त्यालगत ‘गायत्री सेल्स’ या नावाचे प्लबिंगचे दुकान आहे. या दुकानाशेजारी असलेल्या हाॅटेलमध्ये एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील कोणीतरी दुकानासमोर फटाक्यांची माळ लावली. फटाक्यांची ठिणगी थेट दुकानात उडाली. त्यामुळे क्षणात दुकानात आग लागली.
दुकानदाराने व कामगारांनी साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने राैद्ररूप धारण केले होते. दुकानातील कामगारांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र, तरीही दुकानातील प्लबिंगचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत दुकानदाराचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. ही फटाक्यांची माळ लावणाऱ्या अज्ञातावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भोसले हे अधिक तपास करीत आहेत.