sugarcane rate agitation: ज्यांच्यासाठी संघर्ष करायचा, त्यांचीच मिळेना शेतकरी संघटनांना ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:15 IST2025-11-15T16:14:17+5:302025-11-15T16:15:15+5:30
कार्यकर्त्यांच्या स्वत:च्या रानाची परवड

sugarcane rate agitation: ज्यांच्यासाठी संघर्ष करायचा, त्यांचीच मिळेना शेतकरी संघटनांना ताकद
सातारा : शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून उसाला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलने करण्यात येत असली, तरी खुद्द शेतकऱ्यांकडून त्याला अपेक्षित पाठबळ मिळत नसल्यामुळे संघर्षाची तीव्रता मर्यादित राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांच्यासाठी ते लढा देत आहेत, तेच शेतकरी संघटनांसोबत रस्त्यावर उतरत नाहीत, ही खंत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस व दुधाला चांगला दर मिळावा म्हणून उग्र आंदोलन छेडले होते. त्यांच्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की, कोल्हापुरातील साखर कारखान्यांना शेतकरी संघटनांची ताकद कळून आली. परिणामी, त्या जिल्ह्यांमध्ये कारखानदारांना दर ठरवताना संघटनांच्या मागण्यांचा विचार करणे भाग आहे.
सातारा जिल्ह्यात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. कराड तालुक्यात काही प्रमाणात शेतकरी संघटना सक्रिय असल्या, तरी जिल्ह्यातील इतर भागात संघटनांना शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यात जवळपास दीड लाखांपर्यंत शेतकरी असून, १ लाख १५ हजार हेक्टरमध्ये ऊस लागवड केली जाते. या सर्व शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटना संघर्ष करत आहेत. त्यांचे मनोबल वाढण्यासाठी शेतकऱ्यांची साथ गरजेची आहे.
कार्यकर्त्यांच्या स्वत:च्या रानाची परवड
संघटनांच्या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, पोलिसांकडून धरपकड झाली. तर काहींवर साखर दबावतंत्रांचा अवलंब करण्यात आला असून, उसाला तोड येण्यासाठी व्यवस्थापनाकडे अनेक हेलपाटे घालावे लागतात. कारखान्यांविरोधात आंदोलन केल्याचे उट्टे अशारितीने काढण्यात येत असल्याचे संघटनांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.
शेतकरी संघटनांतील कार्यकर्त्यांचा ऊस रानातच वाळवला जातो; परंतु उसाला तोड येत नाही. तसेच दमदाटीचेही प्रकार घडले आहेत. आर्थिक कोंडी करून कार्यकर्त्यांचे कंबरडे मोडले जाते. तरीही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा थांबणार नाही. परंतु, शेतकऱ्यांनीही ऊस दरासाठीच्या संघर्षाला साथ देणे हीच काळाची गरज आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना
जिल्ह्यातील संघटना केवळ ऊस पिकासाठी आंदोलन करतात. परंतु, सोयाबीन, कांदा, गहू, ज्वारी, भात ही पिकेही शेतकरी घेतो; परंतु त्यांना चांगला दर मिळत नाही. त्याबद्दल संघटना बोलत नाही. संघटनांनी सर्व पिकांना योग्य दर देण्यासाठी लढा उभारावा आणि शेवटपर्यंत न्यावा. - महेश कदम, शेतकरी