मुख्यमंत्र्यांचे मत मागवले, पण 'खाशाबां'ना पद्म पुरस्कार कधी? आज कोल्हापूर खंडपीठात सुनावणी
By प्रमोद सुकरे | Updated: May 7, 2026 11:54 IST2026-05-07T11:53:04+5:302026-05-07T11:54:56+5:30
कुस्तीपटू खाशाबा जाधव मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याबाबतच्या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे

मुख्यमंत्र्यांचे मत मागवले, पण 'खाशाबां'ना पद्म पुरस्कार कधी? आज कोल्हापूर खंडपीठात सुनावणी
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकविजेते दिवंगत खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याबाबत नव्याने प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे मत घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले आहेत.तर या प्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार असल्याने दिवंगत खाशाबा जाधव यांना पुरस्कार नेमका कधी मिळणार? असा सवाल क्रीडा प्रेमिकांच्यातून विचारला जात आहे.
मंगळवारी कोल्हापूरला याबाबत न्यायमूर्ती माधव जामदार व न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. केंद्र सरकारच्या वकिलांनी १५ मार्च ते ३१ जुलै या काळात ऑनलाईन स्व-नामांकन करावे. त्यामुळे २६ जानेवारी २६ रोजी जाहीर होणाऱ्या पुरस्कारांसाठी नव्याने अर्ज दाखल करावा असा युक्तिवाद केला. तर खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांचे वकील संग्राम देसाई यांनी याला विरोध केला. "आतापर्यंत ७-८वेळा आम्ही पद्म पुरस्कार समितीकडे अर्ज केले. पण विचार का झाला नाही, याचे कारणच कळले नाही. आता पुन्हा अर्ज मागणे हा अपमान आहे," असे देसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्री, खासदार व ऑलिम्पियनपर्यंत अनेकांनी शिफारस करूनही पुरस्कार का दिला नाही, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, याबाबत गुरुवारी, ७ मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.यावेळी नेमके काय होणार? याकडे कराड तालुक्यातील जनतेसह क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
सन १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर ४४ वर्षांनी लिएंडर पेसने १९९६ मध्ये भारताला दुसरे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. १९८४ मध्ये खाशाबांचे निधन झाले. आता मुख्यमंत्र्यांच्या मतानंतर पुढील निर्णय होणार आहे.
तब्बल ७२ वर्षांची प्रतीक्षा, आता न्यायालयाचा हस्तक्षेप
दिवंगत खाशाबा दादासाहेब जाधव हे कुस्तीपटू होते. सन १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवले.ते स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होते. हा विक्रम १९९६ पर्यंत म्हणजे ४४ वर्षे अबाधित होता.पुढे खाशाबा जाधव यांचे १९८४ साली निधन झाले.त्यानंतर या पुरस्कारासाठी पुत्र रणजीत जाधव यांचा ४० वर्षांचा लढा सुरू आहे. ७/८ वेळा अर्ज केले. असंख्य शिफारशी जोडल्या पण तरीही दाद घेतली गेलेली नाही. आता न्यायालय म्हणते नव्याने प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मत घ्या. पण २०२६ च्या स्वातंत्र्यदिनी तरी ‘ऑलिम्पिकवीर’ खाशाबांना पद्म सन्मान मिळणार का? याबाबत प्रश्न विचारला जात आहे.
सरकारचे वकील या पुरस्कारासाठी ऑनलाइन स्व स्व नामांकन करावे असे सांगत आहेत. पण स्व नामांकन करायला संबंधित व्यक्ती हयात असायला पाहिजे ना? खरंतर हा विषय आता खास बाब म्हणून करून घेण्याचा आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त वेळा याबाबत प्रस्ताव पाठवले आहेत. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तो सरकारने सकारात्मक घ्यावा असे मला वाटते.
- रणजित जाधव, खाशाबा जाधव यांचे पुत्र