Satara Crime: शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, साताऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:27 IST2025-10-20T12:26:53+5:302025-10-20T12:27:23+5:30
आरोपींनी चक्रवाढ व्याजाचा तगादा लावून त्यांना आर्थिक व मानसिक छळ केला

Satara Crime: शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, साताऱ्यातील घटना
म्हसवड : माण तालुक्यातील जांभुळणी येथील वीरकर वस्ती येथील शेतकरी बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर (वय ५५) यांनी खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून मानसिक त्रासातून आत्महत्या केली होती. याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जांभुळणी, ता. माण, वीरकर वस्ती येथील शेतकरी बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर यांनी तीन वर्षांपूर्वी आरोपी अशोक बाबा कोकरे, प्रवीण अशोक कोकरे आणि दीपक अशोक कोकरे (सर्व रा. जांभुळणी, ता. माण, जि. सातारा) यांच्याकडून दहा हजार इतकी रक्कम घेतली होती. ती रक्कम दहा टक्के व्याजासह परत केल्यानंतरही आरोपींनी चक्रवाढ व्याजाचा तगादा लावून त्यांना आर्थिक व मानसिक छळ दिला.
याचदरम्यान आरोपींनी व्याजाच्या मोबदल्यात जानकर यांच्या नावावर असलेली २४ गुंठे शेतजमीन दस्तऐवज करून घेतली. उर्वरित रक्कम न देता शेतकऱ्याला त्रास देत राहिले. या त्रासामुळे बाळकृष्ण जानकर यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केली आहे.
या घटनेची म्हसवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत होते. चौकशीत तिघा आरोपींचा त्रास आणि सावकारी व्यवहार स्पष्ट झाल्याने म्हसवड पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.