Satara ZP: सातारा जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची गटनोंदणी पूर्ण; अध्यक्ष निवडीच्या तारखेची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:58 IST2026-02-17T15:58:28+5:302026-02-17T15:58:51+5:30
शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अशोक दगडू पाटील यांची यापूर्वीच निवड झाली आहे

Satara ZP: सातारा जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची गटनोंदणी पूर्ण; अध्यक्ष निवडीच्या तारखेची प्रतीक्षा
सातारा : जिल्हा परिषदेत प्रमुख पक्ष राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपच्या सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. शिंदेसेनेने गुरुवारी (दि. १२) ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता ग्रामविकास व पंचायत राज खात्याकडून जिल्हा परिषद निवडीचा कार्यक्रम जाहीर होऊन जिल्हाधिकारी प्रत्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर करणार, याकडे सर्व सदस्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत सध्याची पक्षीय बलाबल भाजपचे २७, राष्ट्रवादी (अजित पवार) चे २० तर शिंदेसेनेचे १५ सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची किंवा भाजपने यापैकी एका पक्षाला सोबत घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पहिला दावा कोणता पक्ष करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गटनोंदणीची प्रक्रिया सुरू होती. शिंदेसेनेने चार दिवसांपूर्वी गटनोंदणी केली आहे. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी (अजित पवार)चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांच्या उपस्थितीत अनिल देसाई, ॲड. उदयसिंह पाटील, उदय कबुले यांच्यासह सर्व वीस सदस्यांनी आवश्यक पूर्तता करून गटनोंदणी केली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार)चे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत राजू भोसले, प्रिया शिंदे, सोनल गोरे आदींसह सर्व २७ सदस्यांनी गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.
जिल्हाधिकारी निवडीची अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत सत्तास्थापनेची गणिते मांडली जाणार आहेत. त्यामुळे हालचालींना आणखी वेग येणार आहे.
गटनेतेनदी कबुले, राजू भोसले
गटनोंदणीनंतर पक्षांच्या गटनेत्यांच्याही निवडी जाहीर करण्यात करण्यात आल्या. त्यानुसार राष्ट्रवादी (अजित पवार)च्या गटनेतेपदी उदय कबुले यांची तर भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले यांची निवड करण्यात आली आहे. शिंदेसेनेच्या गटनेतेपदी अशोक दगडू पाटील यांची यापूर्वीच निवड झाली आहे.